टीम इंडिया कसोटी मालिकेनंतर बांगलादेशला टी 20I मालिकेत पराभूत करण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात एकूण 3 सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील सलामीचा सामना हा रविवारी 6 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरमधील न्यू माधवराव शिंदे स्टेडियममध्ये होणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. स्टार मुंबईकर खेळाडू हा दुखापतीमुळे या संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. तर या खेळाडूच्या जागी विस्फोटक फलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
शिवम दुबे ‘क्लिन बोल्ड’
स्टार ऑलराउंडर आणि मुंबईकर असलेला शिवम दुबे हा या मालिकेतून बाहेर पडला आहे. शिवमला पाठीच्या दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागलं आहे. शिवम बाहेर झाल्याने टीम इंडियासाठी हा मोठा झटका आहे. टीममध्ये एक ऑलराउंडर 2 खेळाडूंचं काम करतो, त्यामुळे संतुलन राखण्यात फार मदत होते. मात्र आता शिवम नसल्याने त्याची जागा भरुन काढणं आव्हानात्मक ठरणार आहे. शिवमच्या जागी संघात युवा तिलक वर्मा याचा समावेश करण्यात आला आहे.
तिलक वर्मा याला संधी
तिलक वर्माचं या निमित्ताने भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. तिलक गेल्या अनेक महिन्यांपासून टीममधून बाहेर होता. तिलकला याआधी जानेवारी 2024 मध्ये अफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेत संधी मिळाली होती. त्यानंतर आता तिलकला बांगलादेश विरुद्ध प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्थान मिळणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
बांगलादेश विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.
टी 20i मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, तंजीद हसन, परवेज होसैन इमोन, तॉहीद हृदॉय, झाकेर अली, महेदी हसन, रिशाद होसैन, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, रकीबुल हसन आणि महमुदुल्लाह.