Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्रप्रचंड लोकप्रियता असतानाही ‘सीआयडी’ मालिका का बंद पडली? शिवाजी साटम म्हणाले..

प्रचंड लोकप्रियता असतानाही ‘सीआयडी’ मालिका का बंद पडली? शिवाजी साटम म्हणाले..

‘सीआयडी’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका होती. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. प्रचंड लोकप्रियता असतानाही या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप का घेतला, असा अनेकांचा प्रश्न होता. या प्रश्नाचं उत्तर आता खुद्द अभिनेते शिवाजी साटम यांनी दिलं आहे. ते या मालिकेत एसीपी प्रद्युमनच्या भूमिकेत होते. मालिकेचे निर्माते आणि सोनी वाहिनी यांच्यातील वादामुळे 20 वर्षांपासून सुरू असलेली ही मालिका बंद झाली असावी, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी सीआयडीची टेलिव्हिजनवर अनेक वर्षांपासून चाललेल्या इतर शोज आणि मालिकांशीही तुलना केली.

 

‘फ्रायडे टॉकीज’ला दिलेल्या मुलाखतीत शिवाजी साटम म्हणाले, “आम्ही वाहिनीला सतत विचारायचो की ते हा शो का बंद करतायत? कौन बनेगा करोडपतीसोबत (केबीसी) आमची कांटे-की-टक्कर होती. हे खरंय की सीआयडीच्या टीआरपीमध्ये थोडीशी घट झाली होती. पण हे इतर मालिकांच्या बाबतीतही होतं. मालिका बंद करण्याआधी त्यांनी त्याच्या शेड्युलसोबत छेडछाड केली. सुरुवातीला ही मालिका रात्री 10 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला यायची. नंतर त्यांनी ही वेळ बदलून 10.30 आणि कधीकधी 10.45 सुद्धा केली. यामुळे प्रेक्षकवर्ग मालिकेपासून दुरावला गेला.”

 

“सोनी वाहिनी आणि निर्माते यांच्यात काही वाद सुरू होते. म्हणून त्यांना मालिका बदलायची होती. पण आमच्यासाठी हा फक्त प्रामाणिकपणाचा प्रश्न नव्हता. आमच्यासाठी ही एक मैत्री होती. आम्ही सर्वजण एकत्र इथपर्यंत आलो होतो. आम्ही एक टीम म्हणून काम करत होतो”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

 

सीआयडी’ ही मालिका 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि 2018 पर्यंत ती मालिका ऑन एअर होती. तेव्हापासून तब्बल 1500 एपिसोड्स ऑन एअर करण्यात आले. आजही या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सीआयडी एका नव्या सिझनसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला यावा, अशी असंख्य जणांची इच्छा आहे.भारतीय टेलिव्हिजनवर सर्वाधिक काळ चाललेल्या मालिकांपैकी ही एक होती. या मालिकेत शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव, दयानंद शेट्टी, दिनेश फडणीस, नरेंद्र गुप्ता यांच्या मुख्य भूमिका होत्या.

 

याआधी दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता दयानंद शेट्टीनेही मालिका बंद पाडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. “आम्हाला असं वाटतं की 20 वर्षांपासून ज्या गतीने आणि ज्या क्रेझने ही मालिका सुरू होती, त्यानुसार ती बंद करायला पाहिजे नव्हती. यात काही अंतर्गत राजकारण असू शकतं किंवा मी याला नियती असं म्हणेन. तरीसुद्धा आम्हाला असं वाटतं की कुठेतरी ही मालिका बंद पाडण्यात आली”, असं तो म्हणाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -