Wednesday, October 16, 2024
Homeइचलकरंजीयंत्रमाग कामगारांच्या कल्याणकारी मंडळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार 

यंत्रमाग कामगारांच्या कल्याणकारी मंडळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार 

इचलकरंजी/प्रतिनिधी –

राज्यातील विकेंद्रीत क्षेत्रातील यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांच्या मागणीवरुन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी या संदर्भातील कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना वस्त्रोद्योग सचिवांना दिल्या आहेत. त्यामुळे कल्याणकारी मंडळाचा प्रश्‍नही लवकरच मार्गी लागणार आहे.

देशातील एकूण विकेंद्रीत क्षेत्रातील यंत्रमागांपैकी 55 ते 60 टक्के यंत्रमाग केवळ महाराष्ट्र राज्यात आहेत. त्यामधील कामगारांची संख्याही लक्षणीय असून देशातील एकूण कापड उत्पादनापैकी 62 टक्के उत्पादन या विकेंद्रीत क्षेत्रातील यंत्रमाग उद्योगातून होते. या विकेंद्रीत उद्योगातील कामगारांसाठी बांधकाम कामगार मंडळाच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याबाबत  सातत्याने मागणी होत आहे. या प्रश्‍नी आमदार प्रकाश आवाडे यांनीही सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरु ठेवलेला आहे.

कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यासंदर्भात नेमलेल्या कमिटीने राज्य शासनाकडे सविस्तर अहवाल सादर केला आहे. यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ हे बांधकाम कामगार मंडळाच्या धर्तीवरच स्वनिधीतून चालविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रतिकिलो सूतावर सेस आकारणी करून त्यामधून गोळा होणार्‍या निधीतून यंत्रमाग कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास मंजुरी दर्शविली आहे. त्यामुळे बांधकाम कामगार मंडळाच्या धर्तीवर यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव तातडीने मंत्रीमंडळासमोर ठेवून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रात म्हटले आहे.

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी वस्त्रोद्योग सचिवांना या संदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -