पाडापाडी करणार की विधानसभा निवडणुकीत उमेदवार देवून निवडणूक लढणार याचा फैसला, जरांगे पाटील 20 तारखेला घेणार आहेत. त्यासाठी मराठा बांधवांना त्यांनी 20 तारखेला अंतरवाली सराटीला बोलावलं आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर शिंदेंना आरक्षण देण्यापासून रोखल्याचा आरोप केला आहे. मराठ्यांना मुख्यमंत्री शिंदेंना आरक्षण द्यायचंच आहे, मात्र फडणवीसांनी रोखल्याचं जरांगे म्हणाले आहेत. तर, अधिकार मुख्यमंत्र्यांनाच असताना फडणवीसच टार्गेट का ?, शिंदेंवर का बोलत नाही असा सवाल मंत्री गिरीश महाजनांनी केला आहे.
इकडे मुख्यमंत्र्यांनी महायुती सरकारनं मराठा समाजासाठी काय काय केलं, हे पाहावं. ज्यांनी काहीच दिलं नाही त्यांचा जरांगेंनी निवडणुकीत विचार केला पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या संभाजी राजेंनी जरांगेंना सोबत येण्याची ऑफर दिली आहे. मनोज जरांगे यांनी एक तर सोबत यावं किंवा उमेदवार तरी द्यावेत असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर, मराठवाड्यात 8 पैकी 7 लोकसभा मतदारसंघात जरांगेंना फॅक्टर दिसला. जालन्यात काँग्रेसचे कल्याण काळे विजयी झालेत. भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पराभूत झाले. बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे विजयी झाले. पंकजा मुंडे पराभूत झाल्या, लातूरमध्ये काँग्रेसचे शिवाजी काळगे विजयी झाले, भाजपच्या सुधाकर श्रृंगारेंचा पराभव झाला. नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंत राव चव्हाण विजयी झाले तर भाजपचे प्रतापराव चिखलीकरांचा पराभव झाला.
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय जाधव विजयी झालेत…महायुतीचे महादेव जानकर पराभूत झाले. हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर विजयी झाले आणि शिंदेंच्या शिवसेनेचे बाबूराव कोहळीकर पराभूत झाले. धाराशीवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विजय झाले तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांचा पराभव झाला.
फक्त छत्रपती संभाजीनगर ही एकमेव मराठवाड्यातली जागा आहे जिथं शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे विजयी झाले आणि MIMचे खासदार इम्तियाज जलील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पराभूत झाले.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगेंची आहे. पण सरसकट मराठा समाजाला ओबीसी करणं शक्य नसल्याचं सरकारनं म्हटलं. त्यामुळं आता लोकसभेप्रमाणं पाडापाडी होणार की स्वत: जरांगे आमदार निवडून आणण्यासाठी उमेदवार देणार हे 20 तारखेला ठरेल