महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून अजूनही घमासान सुरूच आहे. महाविकास आघाडीमध्ये 260 जागांवर तोडगा निघाला असून अजूनही 28 जागांवर चर्चा सुरुच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही (Kolhapur District Assembly Constituency) महाविकास आघाडीमध्ये तीन जागांवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरु आहे. कोल्हापूर उत्तर, राधानगरी आणि शिरोळ या तीन मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून दावे केले जात आहेत. त्यामुळे हे तीन मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार? याची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.
महायुतीकडून कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी शिंदे गटाकडून निश्चित मानली जात आहे. त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार याची चर्चा आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून या मतदारसंघांमध्ये संजय पवार आणि रविकिरण इंगवले यांच्यामध्ये चुरस सुरू आहे. मात्र या मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी विजय मिळवला होता.
राधानगरीसाठी काँग्रेसकडून जोर
महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलानुसार ज्या ठिकाणी विद्यमान आमदार ज्या पक्षाचा आहे ती जागा त्याच पक्षाला सोडली जाणार आहे. 2019 मध्ये ही काँग्रेसने या जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे ही जागा काँग्रेसच्याच वाट्याला जाण्याची शक्यता आहे. राधानगरी मतदारसंघ सुद्धा वादामध्ये अडकला आहे. या मतदारसंघामध्ये माजी आमदार के पी पाटील आणि ए वाय पाटील यांच्यामध्ये चुरस सुरू आहे. मात्र या दोघांची उमेदवारी ज्या पक्षाला हा मतदारसंघ वाटायला जाईल त्यांच्याकडूनच ते रिंगणामध्ये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मतदारसंघ सुद्धा काँग्रेसला मिळतो की ठाकरे गटाला मिळतो याकडे लक्ष असेल.
मतदारसंघातून प्रकाश आबिटकर विद्यमान आमदार आहेत. ते सुद्धा शिंदे गटात आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये राधानगरी तालुक्याने शाहू महाराजांना भरभरून मतदान दिले होते. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी विजयी होऊ शकतो असा विश्वास काँग्रेस नेतृत्वाला आहे. त्यामुळे या मतदारसंघांसाठी काँग्रेसकडून ताकद लावली जात आहे.
राधानगरी आणि शिरोळच्या बदल्यात कोल्हापूर उत्तर देणार?
दुसरीकडे शिरोळमध्ये सुद्धा उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबत चांगली चर्चा सुरू आहे. माजी आमदार उल्हास पाटील शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, या मतदारसंघावर सुद्धा काँग्रेसकडून दावा केला जात आहे. त्यामुळे राधानगरी आणि शिरोळ हे दोन मतदारसंघ काँग्रेसने जागावाटपाच्या बोलणीत आपल्याकडे खेचल्यास कोल्हापूर उत्तर मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. अशा स्थितीत कोल्हापुरात ठाकरे गटाकडे शाहूवाडी आणि कोल्हापूर उत्तर असे दोन मतदारसंघ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागा वाटपामध्ये हे मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार याचीच उत्सु
कता आहे.