पुण्यातील महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रोस्थानकाला रविवारी मध्यरात्री भीषण आग(fire) लागली. या घटनेची माहिती मिळताच येथे अग्निशामक दलाचे पाच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. आग लागली तेव्हा प्रवाशांची वर्दळ नव्हती. यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून येथील आग(fire) विझवण्यात आली. वेल्डिंगचे काम सुरु असताना येथे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या या स्थानकाला आग लागल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
26 सप्टेंबर रोजी या मेट्रोस्थानकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं होतं. मेट्रोचे काम अर्धवट असताना त्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यात अशी घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या घटनेबाबत खासदार मुरलीधर मोहोळ यांनी देखील ट्वीट केलं आहे. “मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी प्रकार काही वेळापूर्वी घडला होता. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सदरील घटना मेट्रोचे प्रवासी कामकाज संपल्यानंतर घडली होती.
मेट्रो स्टेशनच्या भागात वेल्डिंगची काम सुरू असताना हा प्रकार घडला. यासंदर्भात मेट्रोचे कार्यकारी संचालक श्रवण हर्डीकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली असून या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मेट्रो प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.”, असं ट्वीट मुरलीधर मोहोळ यांनी केलंय.