बीसीसीआयने परंपरेनुसार पुन्हा एकदा आगामी 2 मालिकासांठी शुक्रवारी 25 ऑक्टोबरला उशिराने भारतीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टी 20i आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला. टीम इंडिया दक्षिण आफ्रिके विरुद्ध 4 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. टी 20i मालिकेला 8 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. सूर्यकुमार यादव या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर रोहित शर्मा टेस्ट सीरिजमध्ये कॅप्टन्सी सांभाळणार आहे. कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. टी 20i सीरिजसाठी 15 आणि कसोटी मालिकेसाठी 18 मुख्य आणि 3 राखीव खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. मात्र यामध्ये युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड याच्याकडे निवड समितीने पुन्हा एकदा दुर्लक्ष केल्याचं समोर आलं आहे.
निवड समितीने ऋतुराजची ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड केली नाही. त्यामुळे ऋतुराज चाहत्यांनी सोशल मीडियावरुन बीसीसीआयवर जोरदार टीका केली आहे. टीम इंडिया ए बॉर्डर गावस्कर ट्रॉफीआधी ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात टीम इंडिया ए ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध 2 फर्स्ट क्लास मॅचेस खेळणार आहे. तर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडिया ए रोहित सेनाविरुद्ध भिडणार आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेआधी रोहितसेनेला तेथील परिस्थितीची माहिती व्हावी, या उद्देशाने हा सामना आयोजित करण्यात आला आहे. टीम इंडिया ए च्या सामन्यांना 31 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी टीम इंडिया ए ऑस्ट्रेलियाला पोहचली आहे. त्यामुळे ऋतुराजची दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी निवड होणार नाही, हे स्पष्ट होतं. मात्र ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेसाठी संधी न मिळाल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
टीम इंडिया ए बॉर्डर गावस्कर ट्रॉफाआधी एकूण 3 सामने खेळणार आहे. त्यामुळे ऋतुराजचा या 3 सामन्यात चांगलाच सराव होईल. तसेच त्याला तेथील परिस्थितीचा चांगला अंदाज येईल. टीम इंडिया एचं नेतृत्व असल्याने आणि त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी पाहता ऋतुराजला कसोटी मालिकेत संधी मिळण्याची शक्यता होती. मात्र तसं न झाल्याने अनेक जणांना बीसीसीआयच्या डोक्यात नक्की काय चाललंय? असा प्रश्न या निमित्ताने पडला आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं वेळापत्रक
पहिला सामना, 22 ते 26 नोव्हेंबर, पर्थ.
दुसरा सामना, 6 ते 10 डिसेंबर, एडलेड ओव्हल, (डे-नाईट).
तिसरा सामना, 14 ते 18 डिसेंबर, गाबा.
चौथा सामना, 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न.
पाचवा सामना, 3 ते 7 जानेवारी, सिडनी.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.