टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 22 नोव्हेंबरपासून होणार आहेत. बॉर्डर गावसकर ट्रॉफी या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 5 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्यासाठी टीम इंडियाला 4-1 ने ही मालिका जिंकायची आहे. टीम इंडियाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलियात पोहचली आहे. त्यानंतर आता टीम इंडियासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज आणि फलंदाजांचा कर्दनकाळ मोहम्मद शमी रणजी ट्रॉफीत कमबॅक करण्यासाठी तयार आहे. शमीने रणजी ट्रॉफीत आपली छाप सोडली तर त्याचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी समावेश केला जाऊ शकतो.
मोहम्मद शमी बंगालकडून खेळणार
मोहम्मद शमी याचा रणजी ट्रॉफीसाठी बंगाल टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. बंगाल विरुद्ध मध्यप्रदेश यांच्यात 13 नोव्हेंबरपासून इंदूर येथे येथे हा सामना होणार आहे. त्यामुळे शमी या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.
वर्षभरानंतर खेळणार सामना!
मोहम्मद शमी वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलनंतर एकही सामना खेळलेला नाही. शमीला दुखापतीमुळे वर्षभरापासून क्रिकेटपासून दूर रहावं लागलं आहे. शमीने वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या होत्या. शमीने या कामगिरीसह टीम इंडियाला अंतिम फेरीपर्यंत पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली होती.
आला रे आला शमी आला
कसोटी क्रिकेटमध्ये शतकांचं द्विशतक
दरम्यान मोहम्मद शमी याने कसोटी क्रिकेटमध्ये 200 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. शमीने 64 कसोटी सामन्यांमध्ये 229 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 101 एकदिवसीय सामन्यांमध्ये 195 फलंदाजांना बाद केलं आहे. तर 23 टी 20i मॅचमध्ये 24 विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं
दरम्यान आता शमीच्या कमबॅकमुळे ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं आहे. शमीची ऑस्ट्रेलिया विरुद्धची कामगिरी ही शानदार आहे. शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 12 कसोटी सामने खेळले आहेत. शमीने त्या 12 सामन्यात 44 विकेट्स घेतल्या आहेत. शमीने त्यापैकी ऑस्ट्रेलियात खेळलेल्या 8 सामन्यात 31 विकेट्स घेतल्या आहेत.