Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रगोल्ड ETF गुंतवणुकीतील लोकप्रियता वाढली ; नफा मिळवण्याचा जबरदस्त मार्ग

गोल्ड ETF गुंतवणुकीतील लोकप्रियता वाढली ; नफा मिळवण्याचा जबरदस्त मार्ग

लोक आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक पर्याय शोधत असतात. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांसाठी सोन्यात गुंतवणूक हा एक आकर्षित पर्याय ठरला आहे . भारतात अलीकडे गोल्ड ईटीएफ (गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड) बाबत लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. जागतिक परिषदेच्या अहवालानुसार भारतीय गोल्ड ईटीएफकडे असलेले सोने 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत विक्रमी 54.5 टनांवर पोहोचले असून, हे गेल्या चार वर्षांतील जवळपास दुप्पट झालेले आहे. 2020 मध्ये ही संख्या केवळ 27.4 टन होती.

 

गोल्ड ईटीएफ म्हणजे काय ?

गोल्ड ईटीएफ म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोने खरेदी करण्याचा एक सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे . प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी गुंतवणूकदार स्टॉक एक्सचेंजवर गोल्ड ईटीएफ खरेदी विक्री करू शकतात. यामुळे चोरीचा किंवा तोटा होण्याचा धोका टाळता येतो.

 

लोकप्रियता वाढण्याची कारणे

भौगोलिक अस्थिरता, सेंट्रल बँकेच्या बदलत्या धोरणांचा प्रभाव तसेच इक्विटी मार्केटमधील अस्थिरता यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. भारतीय म्युच्युअल फंड इंडस्ट्री बॉडी AMFI च्या अहवालानुसार गेल्या 21 महिन्यांत 12448 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक गोल्ड ईटीएफमध्ये झालेली आहे . 2024 च्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर गोल्ड ईटीएफ अधिक आकर्षक ठरले आहेत. नव्या कर रचनेत एका वर्षापेक्षा जास्त काळ सोन्यातील गुंतवणूक ठेवल्यास 12.5% भांडवली नफा कर आकारला जातो.

 

गुंतवणुकीमध्ये वाढ

गेल्या 15 वर्षांत 2011, 2020 आणि 2024 मधील अनिश्चिततेच्या काळात सोन्यातील गुंतवणूक मोठयाप्रमाणात वाढली आहे. 2024 मध्ये गोल्ड ईटीएफद्वारे 12 टन, तर 2011 आणि 2020 मध्ये अनुक्रमे 17 टन आणि 14 टन सोने खरेदी झाले.

 

गुंतवणुकीचे एक आदर्श साधन

गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना अनेक फायदे मिळतात. डायरेक्ट सोन्याच्या दागिन्यांऐवजी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात गुंतवणूक केल्याने चोरीचा धोका पूर्णपणे टाळता येतो, त्यामुळे ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. तसेच लॉकर चार्ज किंवा दागिन्यांच्या मेकिंग चार्जसारख्या खर्चांची बचत होते, ज्यामुळे ही अधिक फायदेशीर ठरते. स्टॉक एक्सचेंजवर शेअर्सप्रमाणे गोल्ड ईटीएफचे व्यवहार सहज करता येतात, ज्यामुळे गुंतवणूक आणि विक्री अधिक सोपी व सुलभ होते. या सर्व फायद्यांमुळे गोल्ड ईटीएफ गुंतवणुकीचे एक आदर्श साधन मानले जाते.

नफा मिळवून देणारी संधी –

गोल्ड ईटीएफ खरेदीसाठी केवळ 1% किंवा त्यापेक्षा कमी ब्रोकरेज आकारले जाते, जे सोन्याच्या पारंपरिक खरेदीच्या तुलनेत कमी आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे गोल्ड ईटीएफ युनिट्सवर कर्ज घेण्याचीही सुविधा उपलब्ध आहे, जी आर्थिक गरजांसाठी उपयोगी ठरते. गोल्ड ईटीएफ भारतीय गुंतवणूकदारांसाठी एक सोपी, सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक संधी ठरत आहे. वाढत्या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोन्यातील गुंतवणूक भविष्यातही स्थिर नफा देणारी ठरू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -