मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करावं अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे.
मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय दिल्लीत होणार असल्याची चर्चा होती. या सगळ्या घडामोडीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी संध्याकाळच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट न घेता परतले. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपनं जबरदस्त कामगिरी केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात घवघवीत यश मिळावलं. भाजप-महायुतीने विधानसभेसाठी आखलेली रणनीती यशस्वी करुन दाखवली. भाजपने राज्यात आपली आतापर्यंतची दमदार कामगिरी करत 132 जागांवर विजय मिळवला. त्यानंतर आता विधानसभेत आपल्या बाजूने संख्याबळ वाढवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
शाह यांची भेट न घेता फडणवीस परतले…
महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत अखेरचा निर्णय हा दिल्लीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मात्र, सोमवारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट न घेता देवेंद्र फडणवीस मुंबईला रवाना झाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस सहभागी झाल्यानंतर मुंबईला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ओम बिर्ला यांच्या कौटुंबिक कार्यक्रमातून लवकर बाहेर पडून ते आपल्या निवासस्थानी दाखल झाले. दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली नाही अशी देखील सूत्रांनी माहिती दिली.
भाजपला 5 अपक्षांचा पाठिंबा
भाजपनं राज्यात 132 जागा जिंकल्या आहेत. तसंच छोटे पक्ष, अपक्ष अशा 5 आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आणि अशोक माने, युवा स्वाभीमानी पक्षाचे रवी राणा, अपक्ष शिवाजी पाटील यांचा समावेश आहे. या अपक्षांच्या पाठिंब्यामुळे विधानसभेत भाजपचं संख्याबळ 137 वर जावून पोहोचलं आहे आणि त्यामुळेचं भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांचं नाव पुढे केलं जात आहे.