राज्यभरातील अनेक शहरांच्या किमान तापमानात घट झाली आहे. गेल्या दोन, तीन दिवसांपासून राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरात फेंगल हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला आहे. या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात पावसाची शक्यता आहे. राज्यात पुण्याच्या तपमानाने या वर्षाचा निचांक नोंदवला. पुण्याचे तापमान ९.९ अंशावर आले. मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदवले गेले आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे, हवामान विभागातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळी
पुण्यात यंदाच्या तापमानाचा नीचांक
पुणे शहरातील कमाल आणि किमान तापमानात घट होत असल्याने थंडीचा जोर वाढला आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच दहा अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. रात्री तापमान घसरलेले असताना दिवसाही हुडहुडी जाणवू लागली आहे. पुढील काही दिवस पुण्यातील तापमानात घट होत राहणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे. पुण्याच्या भोरमध्ये तापमानात घट झाल्याने शहरासह ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या गेल्या आहेत. बोचऱ्या थंडीत धुक्याच्या वातावरणात उब मिळवण्यासाठी नागरिक शेकोट्या पेटवत आहे. तापमानात चांगलीच घट झाल्याने नागरिक गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहे.
फेंगल चक्रीवादळाचा परिणाम
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. आता आलेले फेंगल हे चक्रीवादळ २०२४ मधील तिसरे चक्रीवादळ आहे. यापूर्वी आलेल्या दाना चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठे नुकसान झाले होते. फेंगल चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातील अनेक भागांत पाऊस सुरु झाला आहे. हे चक्रीवादळ तामिळनाडूतून श्रीलंकेकडे जाणार आहे.
राज्यात थंडीचा जोर राहणार
पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, राज्यात पुढील दोन तीन दिवस थंडीचा जोर कायम असणार आहे. यंदा थंडीचे वातावरण लवकर तयार झाले आहे. यामुळे पहाटे बाहेर काम करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.