महायुती सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न दोन लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ज्या महिलांचं वय 18 ते 65 वर्षादरम्यान आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. ही राज्य सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत नोव्हेंबर महिण्यापर्यंतचे हफ्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.डिसेंबरचा हफ्ता देखील लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला होता. या योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाल्यानं निवडणूक निकालानंतर दिसून आलं. याच योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं जात होतं. त्यातच जर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर लाडक्या बहिणींना दीड हजार नव्हे तर 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती. तर त्याच धर्तीवर आम्ही महिलांना तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. मात्र राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे.
दरम्यान आता आचारसंहिता संपली आहे, लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आहे, ती म्हणजे लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर 16 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आणि आचारसंहित लागली. या योजनेतील ज्या महिलांच्या आर्जाची छाणणी बाकी होती, ती तेव्हा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली. मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरीत अर्जाची छाणणी प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर लाभार्थी महिलांची अंतिम यादी बनवण्यात येणार आहे. ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत, त्या त्रुटी दूर करून अर्जदारांनी पुन्हा अर्ज भरावे असं सांगण्यात आलं आहे. जर अर्जामध्ये काही त्रुटी असतील आणि अर्ज पुन्हा भरला नाही तर त्यामुळे खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता कमी आहे.