टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितीका सजदेह या दोघांना काही दिवसांपूर्वी पुत्ररत्न प्राप्त झालं. त्यानंतर आता अनेक दिवसांनी अखेर ज्युनिअर रोहितचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. रितीकाने सोशल मीडियावर पोस्ट करत छोट्या रोहितच्या नावाची घोषणा केली आहे. रोहित आणि रितीका या दोघांनी त्यांच्या मुलाचं नाव दोघांप्रमाणे 3 अक्षरीच ठेवलं आहे. रोहित आणि रितीकाने त्यांच्या मुलाचं नाव अहान असं ठेवलं आहे. रितीकाने इंस्टा स्टोरीवर एक फोटोद्वारे आपल्या मुलाचं आणि समायराच्या छोट्या भावाचं नाव जगजाहीर केलंय.
मिळालेल्या माहितानुसार, काही दिवसांपूर्वी रितीकाने 15 नोव्हेंबरला दुसऱ्या गोंडस बाळाला जन्म दिला. रोहित शर्माने दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर काही वेळ कुटुंबियांसोबत घालवता यावा, यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याचं बीसीसीआयला सांगितलं होतं. त्यानंतर जसप्रीत बुमराहने त्याच्या नेतृत्वात भारताला विजयी सुरुवात करुन दिली. रोहित शर्मा या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियात दाखल झाला आणि टीम इंडियासह जोडला गेला. तेव्हापासून क्रिकेट चाहत्यांना ज्युनिअर रोहितचं नाव कधी जाहीर होणार? त्याचं नाव काय ठेवलं जाणार? याची उत्सूकता आणि प्रतिक्षा होती. अखेर आता ही प्रतिक्षा संपली आहे.
रितीकाच्या इंस्टा स्टोरीत काय?
रितीकाने ख्रिसमस थीमवर आधारीत फॅमिली फोटो शेअर केला आहे. रितीकाने या फोटोत चौघांची नावं दिली आहेत. त्यानुसार रोहित शर्माचा रो, रितीकाचा रित्स, मुलगी समायराचं सॅमी आणि मुलाचं नाव अहान असं स्पष्टपणे दिसत आहे. रितीकाने यासह या इंस्टा स्टोरीत ख्रिसमिस हा हॅशटग वापरला आहे.
रिलेशनशीप आणि लग्न
दरम्यान रोहित शर्मा आणि रितीका सजदेह या दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानतंर 2015 मध्ये विवाहित झाले. रोहित आणि रितीका 13 डिसेंबर 2015 रोजी विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या 3 वर्षांनंतर दोघांना मुलगी झाली. समायरा असं तिचं नाव ठेवण्यात आलं. त्यानंतर आता 6 वर्षांनी समायरा मोठी बहीण झाली आणि तिच्या लाडक्या भावाचं नाव अहान असं ठेवण्यात आलं आहे.