नाशिक जिल्हा द्राक्षाबरोबर कांद्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या सहा महिन्यांपासून भाव खाणारा उन्हाळी कांदा जवळपास संपला आहे. आता नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये लाल कांद्यावरच सर्वांची भिस्त आहे. त्याची आवक वाढत आहे. लासलगाव मुख्य बाजार आवारासह उपबाजार निफाड व विंचूर येथे एक डिसेंबरपासून १२ डिसेंबरपर्यंत 3 लाख क्विंटल नवीन लाल कांद्याची आवक झाली आहे.
आवक दररोज मोठ्या प्रमाणावर होत आहे. लाल कांदा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी दाखल होत असल्याने दरात घसरण होत आहे. या लाल कांद्याला जास्तीत जास्त 5 हजार 641 रुपये, कमीतकमी 1 हजार रुपये तर सरासरी 3 हजार 600 रुपये इतका प्रतिक्विंटलला दर मिळत आहे.
लासलगाव येथून कांद्याचे कंटेनर नुकताच श्रीलंकेसाठी रवाना झाला आहे. लाल कांद्याची आवक वाढल्यामुळे निर्यात शुल्क 20 टक्के रद्द केल्यास परदेशात भारतीय कांद्याला चांगली मागणी मिळू शकते, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
शेतकऱ्यांची निर्यातशुल्क रद्द करण्याची मागणी
कांद्याचे दर स्थिर राहण्यासाठी कांदा निर्यातीवरील 20 टक्के निर्यातशुल्क रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी केंद्र सरकारकडे लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. लासलगाव बाजार समितीकडूनही केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा सुरू केल्याचे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले आहे.
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढल्याने दरात घसरण सुरू झाली आहे. एकट्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 11 नोव्हेंबरला लाल कांद्याची 856 क्विंटल आवक झाली होती. आता डिसेंबरमध्ये ही आवक सरासरी 20 हजार क्विंटलपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्या तुलनेत दरात प्रतिक्विंटल 500 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. आवक कायम वाढत राहिल्यास येत्या काळात दर अजून कमी होण्याची शक्यता वर्तविली जाते.