गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. या तपासात विविध खुलासे होत आहेत. त्यातच आता अंबाजोगाईमधील स्वराती शासकीय रुग्णालयातील बनावट औषध प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भिवंडीच्या अक्वेंटिस बायोटेकच्या मिहीर त्रिवेदीला अटक केली. मिहीरच्या अटकेनंतर आता बनावट औषध पुरवठा कसा व्हायचा याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भिवंडीच्या अक्वेंटिस बायोटेकच्या मिहीर त्रिवेदीने ठाण्याच्या काबीज जेनरिकमधून अॅझिमसिम ५०० या अँटीबायोटिकच्या तब्बल ५० लाख ५५ हजार बनावट गोळ्या खरेदी केल्या होत्या. विजय चौधरी यांनी त्याला या गोळ्या दिल्या होत्या. त्यातील १० लाख ९६ हजार गोळ्या त्याने गुजरातच्या फार्मासिक्स कंपनीला पाठवल्या. तर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाला कोल्हापूरच्या विशाल इंटरप्राईजेसने २५ हजार ९०० गोळ्यांचा पुरवठा केला होता.
वर्धा आणि भिवंडीत गुन्ह्याची नोंद
पण हा पुरवठा स्वराती रुग्णालयात शिल्लक नसून ही कंपनीच अस्तित्वात नसल्याचं तपासात उघड झालं आहे. काबीज जेनेरिक हाऊस विरोधात बनावट औषध पुरवठ्याबाबत यापूर्वी वर्धा व भिवंडी येथेही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यानंतर आता पोलिसांनी विशाल इंटरप्राईजेससह त्याला गोळ्या पुरवणाऱ्या मिहिर त्रिवेदी, सुरतमधील द्विती त्रिवेदी आणि ठाण्याच्या काबीज जेनरिक हाऊसचा विजय चौधरी याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
महाराष्ट्रात आणखी कुठे कुठे औषधांचा पुरवठा?
दरम्यान बनावट गोळ्यांचा पुरवठा करणारा मिहीर त्रिवेदी विजय चौधरीकडून अॅझिमसिमच्या या बनावट अँटीबायोटिकच्या ५० लाख ५५ हजार गोळ्या खरेदी केल्या. ६ मार्च ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत त्याने या गोळ्या खरेदी केल्या होत्या. याप्रकरणी अटकेतील मिहिर त्रिवेदीला न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आज त्याची कोठडी संपत आहे. त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या प्रकरणात आरोपी त्रिवेदीने महाराष्ट्रात आणखी कुठे कुठे औषधांचा पुरवठा केला, याची माहिती घेतली जात आहे. तसेच तो इतर कोणाच्या संपर्कात होता का, याचाही पोलिस तपास करत आहेत.