इचलकरंजीत क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून कोयता आणि लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत दोघेजण जखमी झाले. संकेत हत्तीकर व संजय कुडाळकर अशी जखमींची नांवे आहेत. या प्रकरणी अनुराग कांबळे याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी संकेत हत्तीकर व त्याचा मित्र आदित्य कुडाळकर हे दोघेजण नाष्टा करून परत येत असताना त्यांना रस्त्यात अनुराग कांबळे भेटला. त्याने संकेत याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याच्या कानशिलात मारत मारहाण करण्यास सुरुवात केली.
ते पाहून आदित्य हा वाद मिटविण्यासाठी आला असता अनुराग व त्याच्या अन्य सहकाऱ्यांनी त्यालाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच अनुराग याने संकेत याच्या हातावर व पायावर कोयत्याने मारहाण करत जखमी केले.
काही वेळानंतर आदित्य याचे वडील संजय कुडाळकर मोटरसायकल आणण्यासाठी गेले असताना त्यांनाही डोक्यात स्टील रॉडने मारहाण करण्यात आली. त्यामध्ये ते जखमी झाले आहेत. या प्रकरणी अनुराग कांबळे व अन्य काहीजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.