मध्य प्रदेशात अनेक उद्योजकांकडे आयकर विभाग आणि लोकायुक्ताचे छापे सुरु आहेत. भोपाळमधील अधिकाऱ्यांची फार्म हाऊस कॉलनीजवळ मेंडोरीचे जंगल आहे. या जंगलात रात्री दोन वाजता आयकर विभागाचे पथक पोहचले. त्या पथकाला आरटीओ लिहिल्या गाडीतून 52 किलो सोने आणि 10 कोटींची चांदी मिळाली. या प्रकरणाचे धागेदोरे आरटीओचे माजी कर्मचारी सौरभ शर्मा याच्या घरी केलेल्या छापेमारीशी जुळत आहे. गुरुवारी शर्मा यांच्या घरी छापेमारी झाली होती. भोपाळ, इंदूरमध्ये मागील तीन दिवसांपासून उद्योजकांकडे करण्यात आलेल्या छापेमारीतून दहा कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे.
51 ठिकाणी छापेमारी
जंगलात कारमध्ये मोठ्या प्रमाणावर सोने आणि रोकड पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. आयकर विभागाच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी त्रिशूल कंस्ट्रक्शन, क्वालिटी ग्रुप आणि ईशान ग्रुपच्या भोपाळ आणि इंदूर येथील 51 ठिकाणी छापेमारी केली होती. त्यात सर्वात जास्त 49 ठिकाणे भोपाळमधील होते. त्यात आयएएस, आयपीएस आणि राजकीय नेत्यांची घरे असलेल्या नीलबड, मेंडोरी, मेंडारी या भागांतही छापेमारी झाली. अनेक निवृत्त अधिकारी मेंडोरी आणि मेंडारीत फार्म हाउस करुन राहत आहे. आयकर विभागाने गुरुवारी मध्यरात्री या भागाजवळ असलेल्या जंगलाजवळ कारमधून सोने आणि रोकड जप्त केली.
अशी झाली कारवाई
जंगलात मिळालेली सोने आणि रोकड कोणाचे आहे, त्याची चौकशी अधिकाऱ्यांनी सुरु केली आहे. आयकर विभागाने जप्त केलेले सोने आणि रोकड एखाद्या व्यक्तीच्या घरातून आणलेले असावे, ते ठिकाणांवर लावण्याचा बंदोबस्त करण्यात येणार होता. त्यापूर्वीच ते आयकर विभागाच्या हातात लागले. ही कारवाई 100 पोलीस कर्मचारी आणि 30 गाड्या घेऊन करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरम्यान आयकराचे छापे पडलेल्या बांधकाम कंपनीवर करचुकवेगिरी आणि इतर बेकायदेशीर कामात गुंतल्याचा आरोप आहे. विभागाने या संदर्भात तपास सुरु केला असून संबंधित कागदपत्रे आणि पुरावे यांची कसून चौकशी केली जात आहे. जंगलात एवढी मोठी रोकड आणि सोने कोठून आले आणि ते कोणत्या कामासाठी वापरले जाणार होते, त्याचा शोध आता अधिकारी घेत आहेत.