इचलकरंजीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना नुकताच घडली होती. जागा खरेदीसाठी माहेरुन पैसे आणण्यासाठी छळ करत विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याह्यकरणी पतीसह चौघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सौ. निकिता सत्यम केसरवाणी (वय २३ रा. सुर्वेनगर गल्ली नं. २) असे विवाहितेचे नांव असून पती सत्यम मुनीमचंद केसरवाणी, सासू विमल मुनीमचंद केसरवाणी, सासरा मुनीमचंद भुंवर केसरवाणी आणि दिर सोनु मुनीमचंद केसरवाणी (सर्व रा. सुर्वेनगर ग.नं. २) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सौ. राजकुमारी संजयचंद केसरवाणी (वय ४१ रा. आ. रा. पाटील शाळेमागे नारळ चौक) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सत्यम आणि मुनीमचंद केसरवाणी या दोघांना अटक केली आहे.
सत्यम आणि निकिता यांचा सन २०१९ मध्ये विवाह झाला होता. विवाहाच्याही काही दिवसानंतर निकिता हिचा तिच्या सासरच्यांनी छळ सुरु केला. लत्रात योग्य मानपान केला नाही. या कारणावरुन तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. तसेच जागा घेण्यासाठी माहेरुन पैसे आणण्यासाठी तिच्याकडे सतत तगादा लावला जात होता.
या सर्व छळाला कंटाळून निकिता हिने बुधवारी पहाटे बेडरुममध्ये पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. निकिता हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी निकिताच्या आईने उपरोक्त चौघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे.