आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विठुरायाच्या दर्शनाला आलेल्या श्रीमती आशाताई पवार यांनी देवाच्या समोरील दानपेटीत आपल्या सोबत आणलेले गुप्त दान अर्पण केले. विठुरायाचे दर्शन झाल्यावर श्रीमती आशाताई यांनी आपल्या सोबतच्या लाल पिशवीत जपून आणलेले गुप्तदान स्वतःच्या हाताने देवाच्या हुंडी पेटीत अर्पण केले. सोबत आणलेली रोकड एकावेळी टाकता येत नसल्याने दोन वेळा आशाताईंनी ही रक्कम देवाच्या हुंडी पेटीत अर्पण केली. नोटांचे बंडल जाड असल्याने ते हुंडीत जात नव्हते. अखेर पाचशेच्या नोटांचं हे बंडल आशाताई पवार यांनी ढकलून हुंडीच्या आतमध्ये टाकले. आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी आशाताई या विठ्ठल दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी पवार कुटुंबातील वाद लवकर संपू देत आणि अजित दादांच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ देत असे साकडेही आशाताई पवार यांनी विठुरायाला घातले. अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांना पराभव केला होता.
आज नववर्षाचा पहिला दिवस असल्याने राज्यभरातील प्रमुख देवळांमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसत आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे. पंढरपुरात हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झालेले असताना मंदिर समितीने विठ्ठल मंदिराला जवळपास 5000 संत्र्यांची आकर्षक सजावट केलेली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आळंदी येथील भाविक प्रदीप सिंह ठाकुर यांनी विठ्ठलाचरणी संत्री आणि फुलांची आकर्षक सजावट केली आहे. त्यामुळे मंदिरामध्ये नववर्षाच्या स्वागताचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
दरम्यान, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आटोपल्यानंतर अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फारसे दिसून आलेले नाहीत. संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे हे अडचणीत आले आहेत. अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. मात्र, यानंतर अजित पवार याप्रकरणावर फारसे बोलताना किंवा धनंजय मुंडे यांचा बचाव करताना दिसून आले नव्हते. त्यामुळे अजित पवार नक्की कुठे गायब आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार हे नववर्षानिमित्त सध्या परदेशात फिरायला गेले आहेत. पुढील काही दिवसांमध्ये ते राज्यात परतणार आहेत. यानंतर ते पुन्हा सक्रिय होतील.