विधानसभा निवडणुकांच्या वेळी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधित नवी माहिती जाहीर केली. आता महिलांना दर महिन्याला २,१०० रुपये दिली जातील अशी घोषणा शासनाद्वारे करण्यात आली.
निवडणुका होऊन सत्तास्थापना देखील झाली, तरीही रक्कमेसंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने महिला चिंतातूर झाल्या आहे. दरम्यान या प्रकरणावर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
नेवासा येथे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे वक्तव्य केले. त्यांनी “मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींचा हफ्ता ₹१,५०० वरुन ₹२,१०० होणार आहे. अर्थ संकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना २,१०० रुपये मिळणार आहेत”, असे म्हणत योजनेबाबत मोठी अपडेट दिली.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. निवडणुका होण्यापूर्वीच महिलांना याचा लाभ देण्यात आला. निवडणुकांच्या दरम्यान सरकारने लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्याबाबत घोषणा केली. महिलांना १,५०० च्या जागी २,१०० रुपये देण्यात येतील असे आश्वासन शासनाकडून देण्यात आले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात प्रचंड गाजली. विधानसभेला मिळालेल्या यशाचे श्रेय महायुती सरकार लाडकी बहीण योजनेला देत आहे. ३ मार्च २०२५ रोजी राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचा समावेश असेल असे म्हटले जात आहे.