राज्यातील विधानसभा, लोकसभा या निवडणुकीनंतर आता राज्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आगामी महापालिकांबद्दल स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या महापालिका आम्ही स्वबळावर लढू, अशी मोठी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली होती. यानंतर काल संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर आता त्यांनी एक मोठे विधान केले आहे.
शरद पवार आणि मी भेटलो यात नवीन काय. महाराष्ट्रात एकमेकांना भेटत राहिलं पाहिजे. कटुता ही सत्ताधारी पक्षात आहे. महाविकासाआघाडीत कोणत्याही प्रकराची कटुता नाही. आमच्यात कोणतेही भेदा-भेद नाही. माझ्यात आणि शरद पवारांमध्ये नक्कीच चर्चा झाली. आज शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यावर लक्ष ठेवा, असे संजय राऊत म्हणाले.
इंडिया आघाडी नक्कीच राहील. महाविकासआघाडीही नक्कीच राहिल. जर आम्ही इंडिया आघाडीला जिवंत ठेवलं नाही, तर विरोधक शिल्लक राहणार नाहीत. हे विरोधकांना संपवतील. हे हुकूमशाह आहेत. आमच्यासमोर खूप खतरनाक लोक आहेत. इंडिया आघाडी ही फक्त लोकसभा निवडणुकांसाठीच बनवली होती. पण आता ती तशीच कायम ठेवणं देशाची गरज आहे. लोकशाहीची गरज आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुका होतात. काँग्रेस आणि आप हे एकत्र लढले होते. त्यांची एकही जागा निवडून आली नाही. जर बसून या गोष्टी चर्चेने संपल्या असत्या तर आम्हालाही आनंद वाटला असता. महाराष्ट्रातही आम्ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्या आम्ही स्वबळावर लढू असे सांगितले आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला युती करणं कठीण असते, असेही संजय राऊत म्हणाले.
पण विधानसभा लोकसभेला नक्कीच आमची युती राहील. त्यात काहीही शंका नाही. पण तुम्ही ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत की इंडिया आघाडी तुटली, महाविकासाआघाडी तुटली, असं काहीही नाही. वेगवेगळे पक्ष आहेत, वेगवेगळ्या विचारधारा असतात. लोकशाहीसाठी, लोकांसाठी, संविधानासाठी आम्ही एकत्र येतो. पण यावेळी सर्वांना काही ना काही तडजोडी कराव्या लागतात. भाजप मोठा पक्ष आहे, असे आम्ही NDA मध्ये नेहमी म्हणायचो. त्यामुळे त्यांनी सर्वांना सांभाळून पुढे जाण्याची जबाबदारी भाजपची होती. त्यानुसार आमच्या आघाडीत काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला सर्वांना एकत्र आणण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाचीच असायला हवी, असे आमचे कायम मत होते.
बातमी अपडेट होत आहे…