थकीत कर्जापोटी जप्त करून सील केलेल्या मिळकतीत बेकायदेशीर प्रवेश करत सुरक्षारक्षकाला धमकी दिल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला. पंडित विठ्ठल लखनगावे (वय ५० रा. तारदाळ) असे त्याचे नांव आहे.
या प्रकरणी बँकेच्या वतीने अभिजीत जयवंत कातवारे (वय ४८ रा. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, तारदाळ येथील पंडित लखनगावे यांनी पंजाब नॅशनल बँकेकडून ८३.१४ लाखाचे रुपयांचे कर्ज घेतले होते.
या कर्जाचे हप्ते थकविल्याने बँकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तारण मालमत्ता जप्त केली होती. ती सील करून तेथे खाजगी सुरक्षा रक्षक तैनात केला होता. मागील आठवड्यात रात्रीच्या सुमारास संशयित लखनगावे याने बँकेने सील केलेल्या मालमत्तेत बेकायदेशीरित्या प्रवेश करत तेथे उपस्थित सुरक्षा रक्षकाला धमकावले असे फिर्यादीत नमुद केले आहे.