विधानसभा निवडणुकांच्या आधीपासूनच विविध राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेला इनकमिंग-आऊटगोईंगचा सिलसिला अद्यापही कायम असून शिवसेना ठाकरे गटालाही एकावर एक मोठे धक्के बसताना दिसत आहेत. गेल्या काही महिन्यात ठाकरे गटातील अनेक नेते, कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. हेच एकनाथ शिंदे आता उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसांतच जळगावात ठाकरे गटाला पुन्हा हादरा बसू शकतो. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याचे संकेत मिळत आहेत, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल.
जळगावात ठाकरे गटातील नाराजांना सोबत घेण्याच्या हालचाली सुरू असून जळगाव महापालिकेचे ठाकरे गटातील माजी नगरसेवक शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे चार ते पाच माजी नगरसेवक हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 1 फेब्रुवारीला जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात मनपातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणूक लढलेले तसेच ठाकरे गटाचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या सुद्धा नावाची चर्चा होत आहे.
शिंदे गटात इनकमिंग सुरूच
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शासकीय दौऱ्यासोबत शिवसेना पक्षाचा संघटनात्मक आढावा घेतला जाणार असून यात ठाकरे गटात दुर्लक्षित व संधी न मिळालेले नाराज शिंदे गटात प्रवेशाची शक्यता वर्तवली जाते आहे. जळगावमध्ये महापालिका निवडणुकांच्या आधीच महापालिकेतील नगरसेवकांना सोबत घेत शिवसेना शिंदे गट ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे. आमच्यावर लागलेला गद्दारीचा डाग जनतेने पुसून टाकलेला असून येथे तर शिवसेनेचा भगवाच चालेल असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटल आहे. जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका तसेच पंचायत समितीवर भगवाच फडकणार असल्याचा विश्वास सुद्धा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा पहिला सर्व्हे
दरम्यान नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने पहिला सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये भाजपच्या 30 ते 40 टक्के माजी नगरसेवकांचा नकारात्मक रिपोर्ट कार्ड असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व्हेमध्ये रिपोर्ट नकारात्मक कार्ड असलेल्या नगरसेवकांचा पत्ता कट होणार असून भाजपच्या अनेक इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
उमेदवारी देण्यापूर्वी आणखी सर्वे होणार आहे. तसेच चांगलं काम करणाऱ्या आणि जनतेला मान्य असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. सदस्यता अभियान न राबवणारे, कोवीड मध्ये निष्क्रिय असलेले, कार्यालय बंद ठेवणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा वाजू शकते. जनतेत सक्रियता, लोकांसोबत व्यवहार, निवडून येण्याची क्षमता या मुद्द्यांवर सर्व्हे करण्यात येत आहे.