Friday, November 22, 2024
Homeकोल्हापूरमुश्रीफ नगरपालिका, मनपासह जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर

मुश्रीफ नगरपालिका, मनपासह जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर


नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदेची आगामी निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी केली.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर, जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. मार्केट यार्ड येथील श्री शाहू सांस्कृतिक सभागृहात ही बैठक झाली. आढावा बैठकीच्या निमित्ताने या निवडणुकांचा नारळ फुटल्याचे मुश्रीफ यांनी जाहीर केले.


ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी प्रत्येक पक्षाला पक्ष विस्ताराची मुभा आहे. राष्ट्रवादीही त्याला अपवाद नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वबळाची भाषा करीत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महापालिका या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढविणार आहे.


कोल्हापूर महापालिका निवडणूक मित्र पक्षासोबत कधी एकत्र लढली नाही, तर स्वबळावरच लढली आहे. यावेळीही स्वबळावरच लढणार असल्याचे सांगत त्याचे कारभारी म्हणून व्ही. बी. पाटील यांच्या नावाची घोषणा मुश्रीफ यांनी केली. जि. प., पालिका निवडणुकीत तालुक्यात मित्रपक्षांना सोबत घ्यावे वाटले तरी तशी चर्चा करू. परंतु जास्तीत जास्त प्रयत्न स्वबळासाठीच असेल.



‘त्यांना’ सतत सरकार पडल्याचा भास
राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली असती तर त्यांनी कुणाकुणाला येडे केले असते? कुणाकुणाला ईडी लावली असती? कोणाला फूस लावली असती कोण जाणे? देवेंद्र फडणवीस व आ. चंद्रकांत पाटील अस्वस्थ आहेत. पलंगावरून पडले तरी त्यांना सरकार पडल्याचा भास होतो, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.


2024 मध्ये राष्ट्रवादीचीच सत्ता
राज्यात सध्या तीन पक्ष सत्तेत असले तरी 2024 मध्ये एकाच पक्षाचे सरकार असेल, असे खा. संजय राऊत यांनी वक्तव्य केल्याकडे लक्ष वेधून मुश्रीफ म्हणाले, 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा एकच पक्ष सत्तेत असेल. जिल्ह्यात यापूर्वी मित्र पक्ष झिरो झाला असला तरी राष्ट्रवादी कधीच नव्हता, असेही ते म्हणाले.
मुश्रीफ म्हणाले, दीड वर्षात कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली. राज्यात 60 ते 70 टक्के निधी कोरोनावर खर्च केला आहे. त्यामुळे विकासकामांवर मर्यादा आल्या. आता आर्थिक घडी सुरळीत होत आहे. आगामी काळात राज्यातील विकासाचे चक्र पुन्हा गतिमान करुन राज्य देशात पुन्हा नंबर एकवर आणू.
केंद्र सरकारकडून देशाची ‘वाट’
मुश्रीफ म्हणाले, केंद्र सरकारचे खासगीकरण धोरण, इंधन दरवाढ, रेल्वे, विमानतळ, एलआयसी विकून देशाची ‘वाट’ लावण्याचे काम सुरू आहे. पेगासस प्रकरणात सरकार संसदेत माहिती देण्यास तयार नाही. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आवाज उठविला पाहिजे. राष्ट्रवादी पक्ष सेवेकर्यांचा, जनतेच्या हमालाचा पक्ष असून तो सामान्यांच्या हितासाठी बळकट करूया.


आ. राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, राजीव आवळे, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, अनिल साळोखे, शहराध्यक्ष आर. के. पोवार, व्ही. बी. पाटील, राजेश लाटकर, आदिल फरास, नितीन जांभळे, यासीन मुजावर यांची भाषणे झाली. यावेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, मानसिंग गायकवाड, गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ, रणजित पाटील, किसन चौगले, जि. प. उपाध्यक्ष जयवंत शिंपी, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर उपस्थित होते.


निष्ठावंतांना न्याय द्या; कार्यकर्त्यांचा सूर
महापालिकेत मित्रपक्षाशी आघाडी न करता स्वबळावर लढूया. आघाडी केल्यास कारभारी येतात आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. त्यामुळे स्वबळावर लढूया. हद्दवाढीवर लक्ष केंद्रित करू. मित्रपक्ष हद्दवाढीवर बोलणार नाही. आपण हा विषय घेतल्यास महापालिकेत सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, असा सूर कार्यकर्त्यांतून उमटला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -