महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. महावितरणने(Mahavitaran) पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर केला असून, तो मंजूर झाल्यास पुढील पाच वर्षांत घरगुती विजेचे दर तब्बल २३ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. कोळशावर आधारित महागडी वीज खरेदी करण्याऐवजी सौरऊर्जेवर भर देण्याच्या धोरणाचा हा परिणाम आहे.
महावितरणने(Mahavitaran) पुढील पाच वर्षांचे वीज दर ठरविण्यासाठीचा प्रस्ताव नुकताच वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. या प्रस्तावात, येत्या पाच वर्षात टप्प्याटप्प्याने वीज दर कमी करण्याचे नियोजन असून, सौरऊर्जेचा वापर वाढवून वीज उत्पादन खर्चात बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रस्तावामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
महावितरणचा जवळपास ८५ टक्के खर्च हा वीज खरेदीवर होतो. कोळशावर आधारित वीज महाग असल्याने हा खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जा स्रोतांकडे वळण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. भविष्यात १५ ते १६ हजार मेगावॅट वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.
सध्या महावितरणला दिवसा सरासरी दोन हजार मेगावॅट वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध होते. योग्य नियोजन आणि अंमलबजावणी केल्यास, भविष्यात यात मोठी वाढ होऊन वीज खरेदीवरील खर्चात लक्षणीय बचत होईल, असा विश्वास महावितरणने व्यक्त केला आहे.
प्रस्तावानुसार, येत्या पाच वर्षात घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार आहेत. सर्वसाधारणपणे वीज दर दरवर्षी ८ ते १० टक्क्यांनी वाढणे अपेक्षित असते, परंतु सौरऊर्जेमुळे खर्चात बचत होऊन दर कमी ठेवणे शक्य होणार आहे.