सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरु आहे. बांग्लादेश, दक्षिण अफ्रिकेनंतर इंग्लंडला पराभवाचे तारे दाखवले आहेत. पण सूर्यकुमार यादवचा फॉर्म मात्र गेल्याचं दिसत आहे. मागच्या दहा डावांचा विचार केला तर असंच म्हणावं लागेल.
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेनंतर सूर्यकुमार यादवची कर्णधार म्हणून या फॉर्मेटमध्ये निवड करण्यात आली. यानंतर सूर्यकुमार यादवने 12 सामने खेळले. पण त्याच्या फलंदाजीत तशी काही जादू दिसली नाही. 12 डावात त्याच्या फलंदाजीची सरासरी ही 24.50 आहे.
सूर्यकुमार यादवला शेवटच्या 12 डावांत फक्त 242 धावा करता आल्या. 2022 मध्ये 1164 धावा करणाऱ्या सूर्याने 2023 मध्ये 17 डावांमध्ये 773 धावा केल्या होत्या. पण आता 12 डाव खेळूनही सूर्याला 250 आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात शून्यावर बाद झालेल्या सूर्याने दुसऱ्या सामन्यात फक्त 12 धावा केल्या आणि विकेट दिली. यामुळे सूर्यकुमार यादवने 2025 मध्येही खराब फॉर्मात असल्याचं दिसत आहे.
सूर्यकुमार यादवचा फॉर्म खराब होण्याचं कारण अतिरिक्त जबाबदारी तर नाही ना, अशी चर्चा आता क्रीडावर्तुळात रंगली आहे. इंग्लंडविरुद्धच्या 2 सामन्यांत अपयशी ठरलेला सूर्यकुमार यादव पुढच्या 3 सामन्यात पु्न्हा एकदा जुन्या लयात परतेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.