‘छावा’ या चित्रपटातील एका दृश्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ज्या दृश्यावरून हा वाद सुरू आहे, ते लेझीम नृत्याचं दृश्य चित्रपटातून काढून टाकण्यात येणार, असं उतेकरांनी स्पष्ट केलंय. राज ठाकरेंच्या भेटीविषयी ते म्हणाले, “आम्हाला त्यांचा सल्ला हवा होता आणि त्यांच्याकडून जाणून घ्यायचं होतं. कारण त्यांचं वाचन दांडगं आहे, त्यांना इतिहास चांगल्याप्रकारे ज्ञात आहे. महाराजांबद्दल त्यांचं खूप वाचन आहे. त्यामुळे चित्रपटात नेमके काय बदल करायला हवेत, हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं. चर्चेदरम्यान त्यांनी मला काही सूचना केल्या आहेत. त्या खूप महत्त्वपूर्ण आणि चांगल्या सूचना आहेत. त्यांनी खूप चांगल्याप्रकारे मार्गदर्शन केलं. त्याबद्दल राज साहेबांचे धन्यवाद.”
राज ठाकरेंचा सल्ला अन् दिग्दर्शकांचा मोठा निर्णय
यावेळी चित्रपटातील वादग्रस्त सीन काढण्याबद्दल त्यांनी सांगितलं, “चित्रपटातील लेझीम नृत्याचे सीन्स आम्ही डिलिट करणार आहोत. राज ठाकरेंनीही मला तोच सल्ला दिला. त्या सीनमध्ये आमचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. पण त्यामुळे अप्रत्यक्षपणे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील किंवा कोणाला असं वाटत असेल की आपले राजे असे नाचले नसतील, तर तो सीन आम्ही काढून टाकू. कारण तो चित्रपटाचा काही मोठा भाग नाही. तो एक छोटा भाग आहे. त्यामुळे आम्ही तो सीन डिलिट करू.”
लक्ष्मण उतेकरांची कळकळीची विनंती
‘छावा’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यापूर्वी इतिहासकारांना दाखवणार का, असा प्रश्न लक्ष्मण उतेकरांना विचारण्यात आला. त्यावर ते पुढे म्हणाले, “या चित्रपटाबाबत आम्ही इतिहासकारांबद्दल चर्चा करणार आहोत आणि स्क्रिनिंगचंही आयोजन करण्यात आलं आहे. मला फक्त एवढंच कळकळीनं सांगायचं आहे की आमची संपूर्ण टीम गेली चार वर्षे यावर रिसर्च करतेय आणि एवढा मोठा चित्रपट बनवण्यामागचं कारण हेच आहे की छत्रपती संभाजी महाराज काय होते हे संपूर्ण जगाला कळू दे. ते किती मोठे योद्धे होते, किती महान राजे होते.. हे सगळं जगाला कळायला हवं म्हणून हा चित्रपट बनवला आहे. पण जर का एक-दोन गोष्टी त्याला गालबोट लावत असतील तर त्या डिलिट करायला आम्ही हरकत नाही.”
‘लेझीम’ नृत्याच्या सीनबद्दल काय म्हणाले दिग्दर्शक?
लेझीम या दृश्यावरील वादाबद्दल उतेकरांनी त्यांचं मत व्यक्त केलं. “शिवाजी सावंतांच्या ‘छावा’ या कादंबरीवर या चित्रपटाची कथा आधारित आहे. इतिहासाला खूप वेगवेगळे पदर आहेत. मग नेमका हात कुठे घालायला म्हणून आम्ही ‘छावा’ या कादंबरीचे अधिकृत हक्क विकत घेऊन त्यावर आधारित हा चित्रपट बनवला आहे. ‘छावा’ या कादंबरीत लिहिलंय की छत्रपती संभाजी महाराज हे होळी हा उत्सव साजरा करायचे, होळीच्या आगीतून तो नारळ खेचून घ्यायचे. लेझीम हा आपला पारंपरिक खेळ आहे, त्यात आजचे कुठले डान्स स्टेप्स आहेत असं नाही. आपल्याला लाज वाटावी, असं त्यात काहीच नाही. महाराज कधी लेझीम का खेळले नसतील, हा प्रश्न नेहमी उभा राहतो. त्यावेळी ते वीस वर्षांचे होते. जेव्हा महाराजांनी बुरहानपुरवर हल्ला केला, बुरहानपूर जिंकून ते रायगडावर जेव्हा आले, तेव्हा एक वीस वर्षांचा राजा लेझीम खेळलाही असेल. त्यात गैर काय, असं मला वाटतं. पण जर लोकांच्या आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावत असतील तर तो लेझीम हा प्रकार चित्रपटापेक्षा आणि महाराजांपेक्षा मोठा नाही. त्यामुळे आम्ही तो नक्की डिलिट करू,” असं त्यांनी स्पष्ट केलं.