आज मौनी अमावस्येनिमित्त प्रयागराजच्या महाकुंभात शाही स्नान आयोजित करण्यात आलं आहे. मात्र तत्पूर्वी महाकुंभमध्ये एक मोठी दुर्घटना झाली. महाकुंभातील संगमवर असलेलं एक बॅरिअर तुटल्याने चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये 17 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 60 हून अधिक भावक जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयाच उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेबाबत पीएम मोदी सीएम योगी आदित्यनाथ यांच्याकडून सातत्याने अपडेट्स घेत आहेत. गेल्या तासाभरात त्यांनी योगींना दोन वेळा फोन केला असून जखमींना तात्काळ सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्री योगी यांच्याशी चर्चा केली आहे. या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी तातडीने मदत देण्यावर भर दिला. भाजप अध्यक्ष आणि आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलून सर्व प्रकारची वैद्यकीय मदत देऊ केली. कुंभ नियंत्रित करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनाही मदत करण्याचाही प्रस्ताव देण्यात आला होता. या संपूर्ण घटनेवर प्रशासनाकडून मिनिटा-मिनटाला लक्ष दिलं जात असून सर्व मदत करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. गंगास्नान करा, संगम नाक्याकडे जाऊ नका, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असं आवाहनही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना केलं आहे.
खरंतर महाकुंभच्या संगमावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे गोंधळाचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक आखाड्यांनी शाही स्नान रद्द केले आहे. मौनी अमावस्येला पवित्र स्नानासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते, मात्र या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. चेंगराचेंगरीबाबत विशेष कार्यकारी अधिकारी कुंभमेळा प्राधिकरण आकांक्षा राणा म्हणाल्या, ‘संगम नाक्यावरचा अडथळा तुटल्यानंतर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत काही जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत’.
दुर्घटनेमुळे आम्ही दु:खी – रवींद्र पुरी
‘घडलेल्या घटनेने आम्हाला खूप दु:ख झाले आहे. आमच्यासोबत हजारो भाविक होते. या दुर्घटनेनंतर आज आखाडे स्नानात सहभागी होणार नाहीत, असा निर्णय आम्ही जनहितार्थ घेतला आहे. मी लोकांना आवाहन करतो की आजच्या ऐवजी वसंत पंचमीला आंघोळीसाठी यावे. अनेक भाविकांना संगम घाटावर पोहोचायचे होते,त्यामुळे ही दुर्घटना घडली. मात्र आता भाविकांनी पवित्र गंगा जेथे दिसेल तेथे स्नान करावे.’असे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी सांगितलं.
कशी घडली दुर्घटना ?
मौनी अमावस्येनिमित्त महाकुंभमेळ्यामध्ये शाही स्नान होतं. त्यामुळे कोट्यवधी लोक प्रयागराज येथे दाखल झाले होते. मात्र तेथील संगम घाटावर मध्यरात्रीच्या दरम्यान गोंधळ उडाला. गर्दीच्या दबावामुळे बॅरिकेट तुटलं आणि घटनास्थळी हाहाःकार माजला, गोंधळ उडाला. बघता बघता लोक सैरावैरा पळायला लागले. अनेक लोकं खाली कोसळले, जखमी झाले. परिस्थिती एवढी बिघडली होती की नेमकं काय झालंय, हे कुणालाच सांगता येत नव्हतं.