लग्न झालेलं असताना दुसरा विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. पण एका व्यक्तीने पत्नीला अंधारात ठेऊन दुसरं लग्न केलं. जेव्हा या गोष्टी समोर आल्या, त्यावेळी कौटुंबिक वादाला सुरुवात झाली. नवरा आपल्यासोबतच रहावा असा दोन्ही बायकांचा आग्रह होता. अखेर आता दोन बायकांमध्ये नवऱ्याची वाटणी झाली आहे. तो दोन्ही बायकांसोबत राहणार. तडजोड करुन एका फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. हा फॉर्म्युला पंचायत किंवा कुटुंबाने काढलेला नाही. हा विषय पोलीसात गेल्यानंतर पोलीस कौटुंबिक समुपदेशन केंद्राने या वादातून मार्ग काढला. दोन्ही बायकांनी हा फॉर्म्युला मान्य केला आहे.
या फॉर्म्युल्यानुसार नवरा आठवड्यातले पहिले तीन दिवस पहिल्या बायकोसोबत नंतरचे तीन दिवस दुसऱ्या बायकोसोबत राहील. एक दिवस त्याला सुट्टी देण्यात आली आहे. नवऱ्याने सुद्धा पोलिसांसमोर या प्रस्तावाला मान्यता दिली. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. पूर्णियाचे पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांच्या देखरेखीखाली सुरु असलेल्या पोलीस कौटुंबिक समुपदेशन केंद्राने शुक्रवारी 14 प्रकरण निकालात काढली. काही दिवसांपूर्वी एक महिला पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांच्याकडे आली होती. ती रुपौली येथे रहायला आहे. महिलेने पोलीस अधीक्षकांकडे नवऱ्याविरोधात तक्रारीचा अर्ज दिला होता. त्यात तिने नवऱ्याने सोडून दिलय, पालनपोषणाचा खर्च देत नाही असे आरोप केले होते.
पहिल्या बायकोने काय आरोप केला?
कौटुंबिक विषय असल्याने हा अर्ज पोलीस कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवण्यात आला. अर्ज प्राप्त झाल्यानंतर नवऱ्याला केंद्रात उपस्थित राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली. शुक्रवारी समुपदेशन केंद्रात पती-पत्नी दोघे हजर होते. पत्नीने आरोप केला की, नवऱ्याने घटस्फोट न देता सात वर्षांपूर्वी दुसरं लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. नवऱ्याने दुसरं लग्न केल्याच लपवून ठेवलं होतं.
त्याला काय जाणीव करुन दिली?
पहिल्या पत्नीने आरोप केला की, जेव्हा तिला नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल समजलं, तेव्हा तो तिला सोडून दुसऱ्या पत्नीसोबत राहू लागला. पहिल्या पत्नीने सांगितलं की, त्यांची दोन्ही मुलं मोठी होत आहेत. नवरा त्यांच्या शिक्षणाचा, पालन पोषणाचा खर्च देत नाही. पत्नीचे हे आरोप ऐकून केंद्राने नवऱ्याला खूप सुनावलं. घटस्फोट न देता दुसरं लग्न करणं कायद्याने गुन्हा आहे. पत्नीच्या अर्जाच्या आधारावर तुला शिक्षा होऊ शकते याची त्याला जाणीव करुन दिली.
दुसऱ्या पत्नीबद्दल नवरा काय म्हणाला?
पतीने चूक मान्य केली. आपल्याला पहिली पत्नी आणि मुलांकडे जायचं आहे, पण दुसरी पत्नी असं करण्यापासून रोखतेय, असं त्याने सांगितलं. दुसऱ्या पत्नीला सुद्धा मुलं आहेत. पहिल्या पत्नीच्या घरी गेल्यानंतर दुसरी पत्नी धमकी देत असल्याच त्याने सांगितलं. दोघींच्या कटकटीमुळे हैराण झालो आहे असं तो म्हणाला. समुपदेशन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या पत्नीला सुद्धा सुनावलं. त्याचं पहिलं लग्न झालय हे माहित असताना तू दुसर लग्न करायला नको होतं, असं स्पष्टपणे सांगितलं.
….तेव्हा तिघेही घाबरले
केंद्राच्या सदस्यांनी, तुमचा नवरा आता तुरुंगात जाणार असं सांगितल्यानंतर तिघेही घाबरले. नवरा आणि दोन्ही बायकांनी मिळून ठरवलं की, पती चार दिवस पहिल्या पत्नीकडे आणि तीन दिवस दुसऱ्या पत्नीकडे राहणार. चार दिवस पहिल्या बायकोकडे राहणार, त्यावरुन पुन्हा कटकट सुरु झाली. हा वाढता वाद पाहून केंद्राने ठरवलं की, नवरा तीन-तीन दिवस दोघींकडे राहिलं. एक दिवस त्याला सुट्टी देण्यात आली. सुट्टीच्या दिवशी नवरा ठरवेल त्याला कोणासोबत रहायचे आहे ते.