ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. आतापर्यंत लाडक्या बहिणींना या योजनेचे सात हाफ्ते मिळाले आहेत, आता फेब्रुवारीचा हाफ्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारीचा हाफ्ता देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी अपडेट दिली आहे, ते नाशिकमध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
फेब्रुवारीचा हाफ्ता कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींनी सरकार आणण्यासाठी मोठी जबाबदारी पार पडली. मी इथे येण्यापूर्वीच चेकवर सही करून आलो आहे. त्यामुळे लवकरच फेब्रुवारीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी पण सांगितलं आणि मी पण सांगतो ही योजना बंद होणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
2100 रुपये कधीपासून मिळणार?
दरम्यान आमचं सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या वेळी करण्यात आली. आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये मिळण्याचा अंदाज आहे.
पाल लाख लाभार्थी महिलांना वगळलं
दरम्यान या योजनेसाठी काही निकष बनवण्यात आले होते. मात्र निकषात न बसणाऱ्या महिलांनी देखील या योजनेसाठी अर्ज केला होता. त्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र आता या योजनेत न बसणाऱ्या पाच लाख महिलांची नावं वगळ्यात आली आहेत.