लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा ऐतिहासिक कथानक असलेला चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. हा चित्रपट 2025 या वर्षातील आतापर्यंतचा सर्वोत्तम कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला छप्परफाड कमाई केली आहे. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या रिपोर्टनुसार ‘छावा’ने देशभरात पहिल्या वीकेंडलाच कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. रविवारी या चित्रपटाने 48.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाची कमाई 116.5 कोटी रुपये इतकी झाली आहे.
‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘छावा’ने शनिवारी जगभरात 53 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे जगभराच्या कमाईचा आकडा हा शनिवारीच 100 कोटी पार झाला होता. निर्मात्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या आकड्यानुसार विकी कौशलच्या या चित्रपटाने भारतात केवळ दोन दिवसांत 72.40 कोटी रुपये कमावले आहेत. 100 कोटींचा टप्पा पार करणारा ‘छावा’ हा विकी कौशलच्या करिअरमधील सहावा आणि रश्मिका मंदानाच्या करिअरमधील आठवा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने विकी कौशलच्या आधीच्या ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाचा कमाईचा आकडा पार केला असून येत्या काही दिवसांत ‘राजी’चाही विक्रम मोडणार असल्याचं स्पष्ट होतंय.
रविवारी ‘छावा’चे देशभरात 6670 शोज होते. यात पुणे शहर अग्रस्थानी होतं. 736 शोजसह पुण्यात 94.50 टक्के प्रेक्षकांची हजेरी होती. तर मुंबईत 1441 शोजसह 87.25 टक्के प्रेक्षकांची उपस्थिती होती. हैदराबाद आणि चेन्नईमध्येही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. ‘छावा’ या चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका मंदानासह अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. यामध्ये विकीने छत्रपती संभाजी महाराज, रश्मिकाने महाराणी येसुबाई आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होती.
‘दहा ऑस्कर पुरस्कार वितळवून त्याची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बनवा आणि त्या मूर्तीने अभिनेता विकी कौशलचा सन्मान करा’, अशा शब्दांत प्रेक्षकांनी कौतुक केलंय. तर शेवटची वीस मिनिटं तुम्हाला हादरवून सोडतात आणि त्याचा परिणाम थिएटरबाहेर पडल्यानंतरही राहतो, अंगावर काटा आणणारा आणि डोळ्यात पाणी आणणारा क्लायमॅक्स, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत.