चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात बी ग्रुपमधील 2 कट्टर आणि शेजारी देश भिडणार आहेत. पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 23 फेब्रुवारीला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हायव्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. पाकिस्तान संघावर या सामन्यात अधिक दबाव असणार आहे, त्याचं कारण म्हणजे स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात 19 फेब्रुवारीला न्यूझीलंडविरुद्ध झालेला पराभव. पाकिस्तान आणि टीम इंडिया या दोन्ही संघांचा 23 फेब्रुवारीला मोहिमेतील दुसरा सामना होत आहे. पाकिस्तानची पराभवाने सुरुवात झालीय.
त्यामुळे पाकिस्तानचा आता एका पराभवानंतरही या स्पर्धेतून पत्ता कट होऊ शकतो. तर भारतीय संघ या विजयासह उपांत्य फेरीत सहज प्रवेश करेल. मात्र या सामन्याआधी पाकिस्तानचे कोच आकिब जावेद यांनी भारतीय संघात असलेल्या 3-4 फिरकी गोलंदाजांवरुन प्रतिक्रिया दिली आहे.
टीम इंडियात 5 फिरकी गोलंदाज
पाकिस्तानच्या गोटात एकमेव अबरार अहमद हाच स्पेशालिस्ट स्पिनर आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियात वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर अशी फिरकीपटूंची फौज आहे. टीम इंडिया पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 3-4 फिरकी गोलंदाजांसह खेळू शकते.
आकिब जावेद काय म्हणाले?
आकिब जावेद यांना सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय फिरकीपटूंबाबत प्रश्न करण्यात आला. यावर उत्तर देताना आकिब जावेद म्हणाले, “तुम्हाला आमची प्लेइंग ईलेव्हन टॉसनंतर समजेल. जर टीम इंडिया 3-4 स्पिनर्ससह उतरणार असेल तर तो त्यांचा प्लान आहे. मात्र आम्ही आमच्या ताकदीसह मैदानात उतरु, ज्यामुळे संघात अधिक बदल होणार नाहीत. आम्ही जो संघ निवडलाय, त्यावर मला विश्वास आहे. दुसरा संघ करतोय म्हणून आम्हीही तसं करतोय, असं होत नाही”, असं आकिब जावेद यांनी म्हटलं.
पाकिस्तानच्या गोटात एकमेव स्पेशालिस्ट स्पिनर आहे. यावर आकिब जावेद यांनी प्रतिक्रिया दिली. “मी याबाबत ऐकलंय की इतर संघांकड अनेक फिरकी गोलंदाज आहेत, मात्र आमच्याकडे नाहीत. या तिघांमध्ये सारखीच प्रतिभा आहे. भारताविरूद्धचा सामना फार खास असतो. त्यामुळे हे तिघेही मैदानात खास कामगिरी करतील, अशी आशा आहे”, असं जावेद म्हणाले.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तान क्रिकेट टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), बाबर आझम, कामरान गुलाम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, इमाम उल हक, उस्मान खान आणि सौद शकील.