हाँगकाँगमधील हाय सिक्युरिटी थ्रेडचा कागद मागवून बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या दोघांना करवीर पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. सिद्धेश श्रीकांत घाटगे (रा.दत्तोबा शिंदेनगर कळंबा, ता. करवीर) आणि विकास वसंत पानारी (रा. शिवसृष्टी पार्क शाकंभरी कॉलनी, शिंगणापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. यात १२०० रुपयांच्या बनावट नोटा, बनावट नोटा छापलेले प्रिंटर्स पोलिसांनी जप्त केले. संशयित आरोपींना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, केंद्र सरकारच्या तपास यंत्रणेला घाटगे हे घरी बनावट नोटा छापत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचून छापा टाकला. त्यावेळी घाटगे सरकारचा महसूल बुडवण्यासाठी बाहेरील देशातून साधनसामग्री मागवून बनावट नोटा छापत होते. त्यांना अटक करून त्यांच्याकडील ए फोर साइझचे चार पेपर, पन्नास रुपयांच्या सहा बनावट नोटा, २०० रुपयांच्या चार बनावट नोटा, ५०० रुपयांच्या चार बनावट नोटा, कोऱ्या कागदावर हाय सिक्युरिटी थ्रेड असलेली रंगीत पट्टी त्यावर आरबीआय आणि भारत असे छापलेेले कागद जप्त करण्यात आले. घाटगे याच्याकडे चौकशी केल्यानंतर बनावट नोटा चलनात आणणारा विकास पानारी यालाही पोलिसांनी अटक केली. केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून याची नोंद पोलिसात झाली आहे.
पुणे शहरात बनावट नोटा आढळल्याने खळबळ
गेल्या काही महिन्याखाली पुणे शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या रस्ता पेठेत बनावट नोटा बाळगणाऱ्या एकाला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा गुजरातमधील जामनगरचा आहे. त्याच्याकडून ५०० रुपये दराच्या १४२ आणि शंभर रुपयांच्या ६१ अशा ७७ हजार रुपयांच्या बनावट आणि हुबेहूब दिसणाऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली होती. गौरव रामप्रताप सविता ( वय २४, रा. जामनगर, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई लखन गंगाधर शेटे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलिसांनी शुक्रवारी रात्री कोंम्बिंग ऑपरेशन राबवले होते. यावेळी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीतील लॉजेस तपासत होते. त्यावेळी एकजण हा रस्ता पेठेतील उंटाड्या मारुती मंदिराजवळ थांबला असून, त्याच्याकडे बनावट नोटा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानूसार पोलीस पथक तेथे गेले. पोलिस आल्याची चाहूल लागताच आरोपी तेथून निघून जाऊ लागला. मात्र त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.