जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील गहू काढणीला वेग आला आहे. मागील आठवडाभरापासून बाजारात नवा गहू दाखल होत आहे. गव्हाला सरासरी २८०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे.
पुढील काही दिवसांत बाजारात गव्हाची आवक वाढणार असल्याने गव्हाचे भाव वाढणार की उतरणार याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सर्वसामान्य नागरिक ते नोकरदार वर्ग बाजारात नवा गहू दाखल झाल्यावर चार ते सहा महिने पुरेल एवढा गहू, ज्वारी खरेदी करून ठेवतात. रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच गव्हाला चांगला भाव मिळत असतो. मात्र, आवक वाढत असल्यामुळे गव्हाच्या भावात पुढील काही दिवस घट झाल्याचे दिसू शकते. गहू खाणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे मागणीदेखील त्यांच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील बाजारपेठेत गव्हाचे सध्याचे दर काय ?
वर्धा जिल्ह्यातील गव्हाच्या बाजारपेठेत गव्हाला २ हजार ५०० ते २ हजार ८०० पर्यंत भाव मिळत आहे. याशिवाय लोकल गव्हालादेखील बाजारात मागणी आहे.
लोकल गहू चवदार
जिल्ह्यात लोकल गव्हासह शरबती गव्हाला देखील चांगली मागणी आहे. हा गहू खाण्यासाठी चवदार असल्याने नागरिकांकडून या गव्हाची अधिक मागणी होताना दिसत आहे.
पोषक वातावरणाचा गव्हाला होणार फायदा
यावर्षी रब्बी हंगामात गव्हाची पेरणी चांगली झाली होती. वातावरणदेखील पोषक असल्यामुळे यावर्षी गव्हाचे पीक चांगले बहरले होते. त्यामुळे यावर्षी गहू उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पादनदेखील येत आहे. त्यातून थोडा फार फायदा होत आहे.
वार्षिक धान्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग
नवा गहू बाजारात दाखल झाल्यामुळे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. सध्या गव्हाला चांगला भाव असल्याने शेतकरीदेखील बाजारात नवा गहू घेऊन येत आहेत. यावर्षीचा गहू चांगल्या दर्जाचा असल्यामुळे नागरिक या गव्हाला पसंती देत आहेत.
गहू साठविताना काय काळजी घ्याल?
गव्हाची दीर्घकाळ साठवणूक करण्यासाठी गव्हात कडुलिंबाची पाने शेतकरी टाकून ठेवतात. तसेच गव्हाला कोरड्या जागेवर त्यांची साठवणूक केली जाते. कीड लागणार नाही यासाठी बाजारात पावडरदेखील उपलब्ध आहे. त्याचा अनेक शेतकरी उपयोग करताना दिसून येत आहेत.
२५०० रुपयांहून अधिक भावात गहू विकला जात आहे
सध्या बाजारात गव्हाची आवक वाढली आहेत. अशात बाजारात गव्हाला २ हजार ५०० ते २८०० रूपया पर्यंत भाव मिळत आहे.