सॅनिटरी पॅडच्या आडून प्रतिबंधित दारूची तस्करी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावटी दारूच्या तस्करीचा डाव उधळून लावत राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांतच येणाऱ्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातील प्रतिबंधित दारूच्या साठ्याची सॅनिटरी पॅडच्या आडून तस्करी करण्यात येत होती. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा डाव उधळून लावत संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. त्यांनी एकूण 42 लाख 83 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक -2 यांना खात्रीलायक गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ठाणे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या पथकाने भिवंडी पथकाच्या मदतीने कल्याण – भिवंडी रोडवरील टेमघर परिसरात असलेल्या साईप्रेम हॉटेलजवळ पहाटे 5.30च्या सुमारास सापळा रचला. त्यानंतर तेथे उभ्या असलेल्या एका संशयित सहा टायर टेम्पोची झडती घेण्यात आली. आणि त्याच टेम्पोमध्ये सॅनिटरी पॅड्सच्या बॉक्सच्या आडून परराज्यातील महागड्या दारूचे बॉक्स झाकून ठेवण्यात आले होते. त्यांची तस्करी करण्यात येत होती.
त्यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकातील अधिकाऱ्यांनी धाड टाकून 361 बॉक्स परदेशी बनावटीच्या दारूचे बॉक्स व 362 सॅनिटरी पॅडचे बॉक्स जप्त केले. शेजारच्या राज्यात मद्य किंमत कमी असल्यामुळे ही वारंवार घटना घडत आहे. राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, 2024-2025 वर्षभरात अडीच कोटी रुपयांची 21 हजार बल्क लिटर दारू तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. तर दोन- तीन दिवसांपूर्वी पथकाने सिमेंट मिक्सरमधून सुरू असलेल्या तस्करीचा डावही राज्य उत्पादन शुल्क विभागाने उधळून लावला होता.