लहान बहिणीचे लाड बघवले नाहीत म्हणून भावानेच तिची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार मुंबईमध्ये घडला आहे. 13 वर्षांच्या मुलाने आपल्या 5 वर्षांच्या मामे बहिणीची हत्या केली आहे.
मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यामध्ये ही घटना घडली आहे. सर्व नातेवाईक बहिणीचे लाड करत होते, ते सहन न झाल्यामुळे 13 वर्षांच्या आत्ये भावाने 5 वर्षांच्या बहिणीचा गळा दाबला आणि तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्मद सलमान मोहम्मद रमजान खान (वय 33) हे नालासोपारा पूर्वच्या श्रीराम नगर येथे राहतात, त्यांना दोन मुली आहेत. यातली लहान मुलगी शिद्राखातून ही 5 वर्षांची आहे. मोहम्मद सलमान यांची बहीणही घरासमोरच राहते.
शनिवारी दुपारी कामावरून येताना त्यांनी मुलगी शिद्राखातून हिला शाळेतून घरी आणले. संध्याकाळी शिद्राखातून घराबाहेर खेळत होती, मात्र बराच वेळ झाला तरी ती परत न आल्याने घरच्यांनी तिला शोधायला सुरूवात केली. नातेवाईकांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले, तेव्हा एका सीसीटीव्हीमध्ये खान यांचा 13 वर्षांचा भाचा शिद्राखातून हिला घेऊन जाताना दिसला.
घरच्यांनी मुलाकडे शिद्राखातूनबद्दल विचारलं, तेव्हा त्याने दोन अज्ञात व्यक्ती शिद्राखातूनला डोंगरावर खेळायला घेऊन गेल्या आणि तिला तिथेच मारल्याचं सांगितलं. यानंतर घाबरलेल्या कुटुंबाने रात्री 11.30 वाजता पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी मध्यरात्री डोंगर परिसरात तपास केला असता शिद्राखातूनचा मृतदेह आढळला.
बहिणीचे लाड सहन न झाल्याने हत्या
यानंतर पोलिसांनी 13 वर्षांच्या मुलाची कसून चौकशी केली, तेव्हा त्यात विसंगती आढळून आली. पोलिसांनी मुलाला खोदून खोदून विचारलं असता त्याने आपणच शिद्राखातूनची हत्या केल्याचं कबूल केलं. डोंगरावर तिला खेळायला नेलं आणि तिची हत्या केल्याची कबुली मुलाने दिली आहे.
शिद्राखातून ही घरात सगळ्यांची लाडकी होती, सगळे नातेवाईक तिचे लाड करायचे. आरोपी मुलगा 13 वर्षांचा असून मयत शिद्राखातूनच्या आत्याचा मुलगा आहे. त्याला शिद्राखातूनचे लाड बघवत नव्हते, त्यामुळे संतापून त्याने जवळच्या डोंगरावर नेले आणि तिचा गळा दाबला यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. याप्रकरणी विधी संघर्ष बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला बाल न्याय मंडळापुढे हजर केलं जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप राख यांनी दिली आहे.