बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे (village)अमानुष फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाच्या दबावामुळे अखेर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी ८२ दिवसांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.मात्र, धनंजय मुंडे यांनी राजीनामा देताना त्यामागे वैद्यकीय कारणे असल्याचे सांगितल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी “मी धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार,” असा थेट इशाराच दिला आहे. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर पोस्ट करत, “मी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे” असे सांगितले. मात्र, अंजली दमानियांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत त्यांच्या राजीनाम्याला “निर्लज्जपणाचा कळस” म्हणत जोरदार हल्लाबोल केला. “त्यांना आता अचानक तब्येत बिघडली? मग काल अधिवेशनात ते फेरफटका मारायला आले होते का?” असा खोचक सवाल दमानियांनी केला.
“बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्यापासूनची मागणी आहे” असे सांगणाऱ्या धनंजय मुंडेंना “यांना मनं तरी आहे का?” (village)असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. “तुमचं मन अत्यंत व्यथित झालं म्हणता? मग दोन महिन्यांपासून हे फोटो तुमच्याकडे का होते? आता जेव्हा जनतेचा प्रचंड संताप वाढला, तेव्हा तुम्ही राजीनामा दिला?” असा घणाघात त्यांनी केला.
“राजीनामा ही शिक्षा नाही, त्यांना मंत्रिपदावरून हकालपट्टी करायला हवं!” असेही दमानियांनी जोरदारपणे सांगितले. “हे प्रकरण आता संपलेले नाही. मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यासोबतच, “मी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटेन आणि त्यांची आमदारकी रद्द झाल्यावरच माझ्या लढ्याचा शेवट करेन,” असेही त्यांनी स्पष्ट केले धनंजय मुंडेंच्या पूर्वीच्या आरोपांवर भाष्य करताना अंजली दमानिया म्हणाल्या, “करुणा मुंडे, रेणुका शर्मा यांच्यावर जे अन्याय झाले, त्याची किंमत आता त्यांना चुकवावी लागतेय. (village)त्यांच्या पापाचा घडा आता भरलेला आहे,” असा घणाघात त्यांनी केला.धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू असली, तरी अंजली दमानिया आणि अन्य सामाजिक कार्यकर्ते मुंडेंच्या आमदारकीवरही गंडांतर आणण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. आता या प्रकरणात पुढील राजकीय हालचाली कशा घडतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.