भारत-पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहेत. पाकिस्तानकडून अनेकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. शेजाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवण्याच्या हेतूने भारताने पाकिस्तानसोबतचे बहुतांश व्यवहार बंद केले आहेत. भारताचा पाकिस्तानविरुद्ध व्यवहार ठेवण्यास तीव्र विरोध आहे. त्याचे परिणाम हे क्रीडा क्षेत्रातही पाहायला मिळाले आहेत. त्यामुळेच टीम इंडियाने पाकिस्तानकडे यजमानपद असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी शेजारी देशात जाण्यास नकार दिला. त्यामुळे भारताचे या स्पर्धेतील सामने दुबईत आयोजित करण्यात आले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामनाही दुबईत झाला.
भारत-पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय क्रिकेट मालिका होत नाहीत. दोन्ही देशाचे क्रिकेट संघ हे फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपनिमित्ताने आमनेसामने येतात. त्यामुळे कायमच क्रिकेट चाहत्यांना आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेची प्रतिक्षा असते. मात्र अशात आता भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाहोरमध्ये गेलेल्या बीसीसीआय अधिकाऱ्याने भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेबाबत काय म्हटलं? जाणून घेऊयात.
टीम इंडियाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर बुधवारी 5 मार्च रोजी न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक दिली. आता टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना हा 9 मार्च रोजी दुबईत होणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीतील सामन्याला बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला उपस्थितीत होते. बीसीसीआय उपाध्यक्षांना या निमित्ताने स्थानिक पत्रकारांकडून भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेबाबत प्रश्न करण्यात आले. तसेच दुबईऐवजी लाहोरमध्ये अंतिम सामना व्हायला पाहिजे होता का? असंही बीसीसीआय उपाध्यक्षांना प्रश्न विचारण्यात आला. याबाबत बीसीसीआय उपाध्यक्ष काय म्हणाले हे जाणून घेऊयात.
भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका होणार?
पाकिस्तान आता आयसीसी स्पर्धेचं तसेच अनेक मालिकांचं आयोजन करतंय. भारत-पाकिस्तान यांच्यातील कटुता होऊन पुन्हा उभयसंघात द्विपक्षीय मालिका सुरु व्हावी? असं तुम्हाला वाटतं नाही का?
“भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. हे सरकारला वाटेल तेव्हाच होऊ शकतं. भारत सरकार जे सांगेल बीसीसीआय त्यानुसारच सर्व काही करेल”, असं म्हणत राजीव शुक्ला यांनी भूमिका स्पष्ट केली.
तसेच बीसीसीआय उपाध्यक्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल दुबईऐवजी लाहोरमधील आयोजनाच्या प्रश्नावरूनही उत्तर दिलं. “ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला उपांत्य फेरीत पराभूत केलं असतं तर लाहोरमध्ये अंतिम सामना झाला असता”, असं उत्तर बीसीसीआय उपाध्यक्षांनी दिलं. अंतिम फेरीतील सामना हा दुबईत होणार की लाहोरमध्ये? हे भारताच्या विजय/पराभवावर अवलंबून होतं. भारताचा पराभव झाला असता तर अंतिम सामन्याचं आयोजन हे लाहोरमध्येचं करण्यात येणार होतं. टीम इंडिया सुरक्षिततेच्या कारणामुळे या स्पर्धेतील सामने दुबईत खेळत आहे. त्यानुसार टीम इंडियाने साखळी फेरीतील 3 आणि उपांत्य असे एकूण 4 सामने दुबईत खेळलेत. तर आता रविवारी 9 मार्च रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुबईतच अंतिम सामना होणार आहे.