विश्वास संपादन करून मागणीनुसार सूत पुरविण्याचे सांगत व्यापाऱ्यांची १ कोटी २१ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांच्या कोठडीत असलेला पंकज अग्रवाल व त्यांचा मुलगा पियुश अग्रवाल या दोघांना आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली.
सव्वा कोटीच्या फसवणूकप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात सात सुत व्यापाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पंकज अग्रवाल व पियुश अग्रवाल यास अटक केली होती. मात्र, पियुश अग्रवाल याची प्रकृती खालावल्याने आयजीएम रुग्णालयात दाखल केले होते. त्याची प्रकृती सुधारल्यानंतर पोलिस तपासासाठी पुन्हा ताब्यात घेण्यात येणार असल्याचे समजते. तर गुन्हा दाखल झालेले मयूर अग्रवाल, दिशा अग्रवाल व प्रविण अग्रवाल यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला असून ७ मार्च रोजी सुनावणी ठेवली आहे.
गुन्ह्यातील संशयित प्रविण अग्रवाल याने व्हॅट टॅक्स न भरता ९४ लाखाची फसवणूक केल्या प्रकरणी तसेच गोपीकिशन डागा यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारींचेही दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. दरम्यान, फसवणूक प्रकरणातील रकमा वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून त्यामध्ये रक्कम गुंतविली असल्याची चर्चा बाजारपेठेत सुरू आहे.