टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक दिली. आता उभयसंघात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी 9 मार्चला महामुकाबला होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आयसीसी स्पर्धेतील नॉक आऊटमध्ये 2019 पासून आमनेसामने येण्याची ही चौथी वेळ आहे. याआधी दोन्ही संघ वनडे वर्ल्ड कप 2019 सेमी फायनल, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शीप फायनल 2021 आणि वनडे वर्ल्ड कप 2023 सेमी फायनल या सामन्यांमध्ये आमनेसामने आले. न्यूझीलंडने भारताला पहिल्या 2 सामन्यात पराभूत केलं. मात्र टीम इंडियाने 2023 उपांत्य फेरीत किवींचा धुव्वा उडवत पराभवाची परतफेड केली. मात्र आता चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलआधी टीम इंडियासाठी ही मागील आकडेवारी चिंताजनक नाही. तर फक्त एका कारणामुळेच टीम इंडियाला चिंता आहे. ते नक्की काय? सविस्तर जाणून घेऊयात.
न्यूझीलंडऐवजी दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत पोहचली असती तर टीम इंडियासाठी ते अनेक दृष्टीने फायदेशीर ठरलं असतं. दक्षिण आफ्रिकेकडे फिरकी गोलंदाज मोजून 2 आहेत. त्या दोघांपैकी 1 ऑलराउंडर आहे. तर उलटपक्षी न्यूझीलंडकडे तोडीसतोड आणि एकसेएक फिरकीपटू आहेत. दुबईची खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी पूरक आहे.
साखळी फेरीत आमनेसामने
न्यूझीलंडने दुबईत टीम इंडियाविरुद्ध 2 मार्च रोजी साखळी फेरीत सामना खेळलाय. तसेच अंतिम सामनाही याच दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडला ही खेळपट्टी कशी आहे? याची माहिती आहे. न्यूझीलंडला फायनलच्या पार्श्वभूमीवर दुबईत साखळी फेरीतील सामना खेळल्याचा फायदा होऊ शकतो, ही चिंताजनक बाब आहे.
टीम इंडियाप्रमाणे न्यूझीलंडकडेही 2 पार्ट टाईमसह एकूण 4 स्पिनर्स आहेत. न्यूझीलंडने साखळी फेरीत 2 मार्चला टीम इंडियाला 249 धावांवर रोखलं होतं. टीम इंडियाला 250 धावांआधी रोखण्यात न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांनी निर्णायक भूमिका बजावली होती.
तसेच टीम इंडियाने दुबईत आतापर्यंत 10 एकदिवसीय सामने खेळले आहेत. आकडेवारीनुसार, दुबई हा टीम इंडियाचा गड आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. टीम इंडियाने दुबईत एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही. भारताने दुबईत खेळलेल्या 10 पैकी 9 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 1 सामना बरोबरीत सुटलाय. त्यामुळे टीम इंडियाची दुबईतील आकडेवारी ही भारतीय चाहत्यांसाठी दिलासादायक बाब आहे. मात्र आता न्यूझीलंडला फायनलमध्ये साखळी फेरीतील सामन्याच्या अनुभवाचा फायदा होणार की टीम इंडिया दुबईत 10 वा एकदिवसीय विजय मिळवणार? याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, कायल जेमिसन, विल्यम ओरुर्के, डॅरिल मिशेल, नॅथन स्मिथ, मार्क चॅपमन आणि जेकब डफी.