Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्रढोबळी मिरची, भुईमूग शेंगांचे दर घसरले; हिरवी मिरची, घेवडा, मटार महाग

ढोबळी मिरची, भुईमूग शेंगांचे दर घसरले; हिरवी मिरची, घेवडा, मटार महाग

उन्हाळी कांद्याचा हंगाम बहरल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील कांदा विभागात कांद्याची आवक वाढू लागली आहे. रविवारी (दि.9) बाजारात तब्बल 125 ते 150 ट्रकमधून कांदा विक्रीसाठी दाखल झाला.

 

गतआठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या आवकेत 50 ट्रकने वाढ झाली.

 

बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी राहिल्याने कांद्याच्या दरात घसरण झाली. घाऊक बाजारात कांद्याच्या किलोला 15 ते 18 रुपये दर मिळाला. तर, किरकोळ बाजारात कांद्याची 20 ते 30 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.

 

मध्यप्रदेशातील मटारचा हंगाम संपला असून बाजारात पंजाब येथून मटारची आवक सुरू झाली आहे. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने मटराच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. याखेरीज, हिरवी मिरचीचे भावही वधारल्याचे दिसून आले. परराज्यातून मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने भुईमूग शेंगाचे दर दहा टक्क्यांनी उतरले.

 

ढोबळी मिरचीलाही उठाव नसल्याने त्याच्या भावातही घसरण झाल्याचे सांगण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (दि. 9) 100 ट्रकमधून शेतमाल दाखल झाला. गतआठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक दहा ट्रकने वाढल्याचे सांगण्यात आले. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 7 ते 8 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा 4 ते 5 टेम्पो, राजस्थान येथून 8 ते 10 ट्रक गाजर, कर्नाटक येथून 3 टेम्पो भुईमूग शेंग, सिमला आणि पंजाब येथून सुमारे 6 ते 7 ट्रक मटार, कर्नाटक व तामिळनाडू येथून 5 ते 6 टेम्पो तोतापूरी कैरी, मध्यप्रदेश येथून लसूणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो आवक झाली होती.

 

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 500 ते 600 गोणी, भेंडी 8 ते 10 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो 9 ते 10 हजार पेटी, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 7 ते 8 टेम्पो, ढोबळी मिरची 9 ते 10 टेम्पो, मटार 2 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 120 ते 125 ट्रक, इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 40 टेम्पो इतकी आवक झाली.

 

मेथी, कोथिंबीर, कांदापात, मुळे, पालक भावात वाढ

 

बाजारात पालेभाज्यांची घटलेली आवक कायम आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे मार्केटयार्डातील तरकारी विभागात मेथी, कोथिंबीर, कांदापात, मुळे, पालकच्या भावात जुडीमागे 1 ते 2 रुपयांनी वाढ झाली आहे. तर मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (दि. 9) कोथिंबिरीची 90 हजार जुडी, तर मेथीची 60 हजार जुडीची आवक झाली.

 

मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीरीची आवक स्थिर राहिली तर मेथीची आवक 10 हजार जुड्यांनी घडली. घाऊक बाजारात पालेभाजीच्या एका गड्डीला 3 ते 15 रुपये दर मिळाला. तर किरकोळ बाजारात एका गड्डीची 5 ते 20 रुपयांना विक्री सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -