आपल्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पाहिल्यानंतर संतापलेल्या बापाने लेकीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये घडली आहे. लेकीची हत्या केल्यानंतर या बापाने तिच्या प्रियकराचीही हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी वडिलांना ताब्यात घेतलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागपतमधील बरौत शहरालगतच्या एका गावात रविवारी सकाळी ही घटना घडली. आरोपी वडील पुष्पेंद्र (५०) याला पोलिसांनी अटक केली आहे. मृत तरुण आणि तरुणीचे बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते. दोघेही अनेकदा गुप्तपणे भेटत असत. पण मुलीच्या वडिलांना याची माहिती नव्हती. दरम्यान, रविवारी सकाळी मुलीच्या वडिलांना त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. संतापलेल्या बापाने त्याच्या मुलीचा शोध घेतला. तेव्हा ती शेतामध्ये तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह परिस्थितीत आढळली. हे पाहून मुलीच्या वडिलांचा राग अनावर झाला.
आधी प्रियकराला संपवलं
लेकीला नको त्या अवस्थेत पाहून बापाच्या रागाचा पारा चढला. त्याने प्रथम जागेवर पडलेल्या दोरीच्या तुकड्याने मुलाचा गळा दाबला आणि त्याचा खून केला. मुलीने आरडाओरडा करून त्याला सोडून देण्याची विनंती केली पण त्याने काही ऐकलं नाही. त्यानंतर त्याने मुलीचाही गळा दाबून खून केला. या घटनेची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. काही वेळातच त्या ठिकाणी मोठी गर्दी जमली. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी वडिलांना ताब्यात घेतलं. गावात तणावपूर्ण वातावरण
दरम्यान, ऑनर किलिंगच्या या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण होतंं. त्यामुळे पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली. या घटनेबाबत मुलाच्या कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार दाखल करून संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे, पोलिस चौकशीदरम्यान, गावकऱ्यांनी सांगितले की, मयत मुलगा आणि तरुणीचे बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबांना याची जाणीव होती, पण दोन्ही कुटुंब हे त्यांचं नातं स्वीकारण्यास तयार नव्हती. यामुळे मुलीला तिच्या कुटुंबीयांनी अनेक वेळा इशारा दिला होता. तरीही, मुलगा आणि मुलगी एकमेकांना भेटणे थांबवत नव्हते.