ज्या कुटुंबातील महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य सरकारनं गेल्या वर्षी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या अंमलबजावणीला मागील वर्षी जुलै महिन्यापासून सुरुवात झाली. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण योजनेचा मुद्दा चांगलाच गाजला होता. या योजनेवरून विरोधकांनी सरकारच्या कोंडीचा प्रयत्न केला. तर आम्ही पुन्हा एकदा सत्तेत आलो तर लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती.
दरम्यान राज्यात आता महायुतीचं सरकार आलं आहे. मात्र अजूनही 2100 रुपयांबाबत कोणताही निर्णय झालेला नाहीये. लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजनेंतर्गत 2100 रुपयांची घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र अजूनही त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाहीये. यावरून आता विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे.
1500 रुपयांच्या ऐवजी लाभार्थी महिलांना 2100 रुपये देऊ अशी घोषणा या ठिकाणी झाली होती. ते कधी मिळणार ? अधिवेशनात त्याची घोषणा होणार आहे की नाही? आम्हाला पॉइंटेड उत्तर हवं आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं. रोहित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे, ती महायुतीच्या सरकारनं आणली आहे. महिलांना 1500 रुपयांचा लाभ वितरीत करणारं हे एकमेव सरकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात जो आनंद आहे, तो कायम राहणार आहे. 2100 रुपयांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.