सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर आहे. केंद्र सरकार लवकरच महागाई भत्ता (DA) आणि महागाई राहत (DR) वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. यासंदर्भातील प्रस्ताव या आठवड्यात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे.
जर हा निर्णय घेतला गेला, तर कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळेल आणि त्यांच्या पगारात वाढ होईल.
या वेतनवाढीमुळे DA सध्या असलेल्या 53% वरून 55% पर्यंत जाऊ शकतो. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये DA मध्ये 3% वाढ करण्यात आली होती, तर त्याआधी मार्चमध्ये 4% वाढ जाहीर झाली होती. मात्र, यावेळी वाढीचा आकडा 2% पर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे.
दरवर्षी DA वाढीचा निर्णय मार्च आणि ऑक्टोबरमध्ये घेतला जातो. होळीच्या सणाच्या तोंडावर हा निर्णय जाहीर झाल्यास कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी भेट ठरेल. दरम्यान, सरकारने यावर्षी जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असून लवकरच त्याची अधिकृत स्थापना केली जाणार आहे. नव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर जर DA वाढीचा निर्णय घेतला गेला, तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी आनंदवार्ता ठरेल. आता सर्वांचे लक्ष कॅबिनेटच्या आगामी बैठकीकडे लागले आहे.