होळीच्या आधीच महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमधील अनेक भाग उष्णतेच्या लाटेत (लू) होरपळत आहेत. गुजरात आणि राजस्थानमधील अनेक शहरांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. अनेक ठिकाणी तापमान सामान्यपेक्षा ८.८ अंश सेल्सिअसपर्यंत जास्त
गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील १७ शहरांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमान ४० अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले. केवळ तीन वर्षांत दुसऱ्यांदाच मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात उष्णतेची लाट आली आहे. यापूर्वी २०२२ मध्ये, उष्णतेची पहिली लाट गुजरातमध्ये ११ ते १९ मार्च दरम्यान जाणवली होती. मात्र, २०२२ मध्ये होळी ८ मार्चला आली होती. यावर्षी होळीच्या दिवशी उत्तर-पश्चिम भारतात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गुजरात, त्याला लागून असलेल्या राजस्थान आणि पश्चिम किनारपट्टीच्या कोकण विभागात गुरुवारपासून तापमानात घट होण्याची शक्यता आहे, परंतु उष्णतेची लाट कायम राहील. महाराष्ट्रातील विदर्भात १३ आणि १४ मार्च रोजी, ओडिशामध्ये १३ ते १६ मार्च दरम्यान, झारखंडमध्ये १४-१६ मार्च आणि गंगा नदीजवळच्या पश्चिम बंगालमध्ये १८ मार्च रोजी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पुढील आठवड्यात जोरदार वारे आणि धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील तेलंगणामध्ये बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी उष्णतेची लाट होती. येथे १३ ते १८ मार्च दरम्यानही अशीच स्थिती राहील.
कुठे नोंदवले गेले उच्चांकी तापमान?
बुधवारी देशातील ११ राज्यांमध्ये तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. सर्वात जास्त तापमान राजकोटमध्ये ४२.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा ६.७ अंश जास्त आहे. राजस्थानमधील बाडमेरमध्ये तापमान ४०.६ अंश नोंदवले गेले, जे ५.९ अंश जास्त आहे. गोव्यातील पणजीमध्ये तापमान ३६.८ अंश नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा ४.१ अंश जास्त आहे.
उष्णतेची लाट म्हणजे काय?
सामान्यतः तापमान ४० अंशांपेक्षा जास्त किंवा सामान्यपेक्षा ४.६ अंश जास्त असल्यास उष्णतेची लाट (हीट वेव्ह) स्थिती मानली जाते.
पुढील आठवड्यात हवामानात काय बदल होऊ शकतात?
उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागांमध्ये पुढील ४८ तासांत कमाल तापमानात विशेष बदल होण्याची शक्यता नाही आणि त्यानंतर तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता आहे. खरं तर, पुढील आठवड्यात किमान दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालय ओलांडून जातील. यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या उंच भागात बर्फवृष्टी आणि खालच्या भागात पाऊस पडू शकतो. तसेच, १४ ते १६ मार्च दरम्यान पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तर मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या अनेक भागात ढग दाटून येण्याची आणि काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ईशान्येकडील राज्ये, विशेषतः सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये पुढील ४-५ दिवस पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, पश्चिम राजस्थानसह संपूर्ण पश्चिम भारतातही पुढील ४-५ दिवसांत २ ते ३ अंशांची घट दिसून येऊ शकते, तर मध्य प्रदेश, छत्तीसगडसह मध्य भारतात पुढील ३ दिवसांत कमाल तापमान किमान २ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तापमान स्थिर राहील. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशासह पूर्व भारतात दिवसाचे तापमान किमान ५ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. बिहार आणि झारखंडमध्ये १६ मार्च रोजी काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.