मुंबईसह महाराष्ट्रात होळी आणि धुलिवंदनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यात ठिकठिकाणी नागरिक धुलिवंदनाचा आनंद लुटताना दिसत आहेत. काल होलिका दहनानंतर आज दुसऱ्या दिवशी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुळवड साजरी केली जाते. काही ठिकाणी रंगपंचमीला रंग खेळण्याची पद्धत असते. आज धुळवडीच्या निमित्ताने अनेक मराठी तसेच बॉलिवूड कलाकार धुळवड साजरी करताना दिसत आहेत. तसेच राजकीय नेतेही धुळवड साजरी करताना पाहायला मिळत आहे.
आज सर्वत्र धुळवडीच्या उत्साह दिसून येत आहे. रंग खेळण्यात तरुणाई दंग आहे. नागपुरातही तरुणाई रंगाच्या या उत्सवात सहभागी झाल्याचे चित्र आहे. पाण्याचा वापर न करता कोरडी होळी खेळण्यावर नागरिकांचा भर आहे. गुलाल आणि कोरड्या रंगांसोबत फुलांची होळी खेळण्यात तरुणाईचा उत्साह दिसत आहे.
पुणे, नागपुरात मेट्रो बंद
पुणे शहरात धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर एकत्र येऊन रंगांची उधळण करतात. सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. याच पार्श्वभूमीवर पुणे मेट्रो प्रशासनाने सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच धुलीवंदनाच्या निमित्ताने आज नागपूर मेट्रो तीन वाजेपर्यंत बंद राहणार आहे. आज नागपुरात मेट्रो प्रवासी सेवा दुपारी ३.०० नंतर सुरु होणार आहे. धुलीवंदनाच्या निमित्याने मेट्रोची ऑरेंज लाईन म्हणजेच आटोमोटिव्ह चौक ते खापरी मेट्रो स्टेशन आणि अँक्वा लाईन म्हणजे प्रजापती नगर ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन मार्गावर मेट्रो दुपारपर्यंत बंद राहणार आहे. चारही टर्मिनलवरील मेट्रो स्टेशन येथून प्रवासी सेवा दुपारी ३.०० ते रात्री १०.०० वाजता पर्यंत सुरु राहणार आहे. दुपारी तीन नंतर २० मिनिटांनी ऑरेंज लाईन आणि अँक्वा लाईनवर उपलब्ध असेल.
साताऱ्यात पुरणपोळीचा दानाचा कार्यक्रम
साताऱ्यात होळीची पोळी करू दान हा उपक्रम दरवर्षी अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही ग्रामीण भागामध्ये राबवत असते. मागील दोन वर्षापासून वाढे गावासह इतर गावांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. होळीमध्ये पुरण पोळीचा नैवेद्य न टाकता तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र गोळा केल्या आणि गरीब लोकांमध्ये वाटप करण्यात आले. या उपक्रमाला या गावातील ग्रामस्थांनी मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
मटण-चिकन दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी
आज धुलिवंदनाच्या निमित्ताने ठाण्यात मटण दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कारण धूलिवंदन शुक्रवारी आल्यामुळे मटण आणि चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे. अनेक दुकानाबाहेर लोकांच्या रांगा दिसत आहेत. तसेच पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसिद्ध मटण दुकानासमोर मटण खरेदीसाठी गर्दी झाली आहे. धुळवडीमुळे नागपुरात चिकन आणि मटनच्या दुकानांत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. खवय्यांकडून नागपुरात आज २० कोटींपेक्षा जास्त रुपयांची उलाढाल होणार आहे. ही मागणी वाढल्याने जिल्ह्यात चिकन आणि मटणच्या दरात वाढ झाली आहे. सकाळपासूनंच लोक चिकन आणि मटण खरेदीसाठी दुकानात गर्दी दिसत आहे.