चंद्रपूर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला आहे. पर्यटनासाठी गेलेल्या या पाच मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. पाचही युवक युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे रहिवाशी आहेत. एकाच गावातील पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.
मृतांची नावे जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे, तेजस ठाकरे आहे. पाच ही युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारी रहिवाशी आहेत. त्या युवकांच्या मृत्यूची बातमी कळाल्यावर साठगाव कोलारी येथील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली.
मुलांनी घोडाझरी तलावावर पर्यटनाचा आनंद घेतला. त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास सहा मुले पोहण्याकरिता तलावात उतरली. ज्या ठिकाणी डोह होता, त्या ठिकाणी ही सहाही मुले उतरले. त्यापैकी आर्यन हेमराज हिंगोली हा १६ वर्षाचा मुलगा कसाबसा वाचला. परंतु जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे , अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे हे पाचही मुले तलावात बुडाली.
एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश
बुडालेल्या पाच जणांमध्ये दोन सख्खे भाऊ आहेत. दोन चुलत भाऊ आहेत. हे चार जण जण गावंडे कुटुंबातील आहेत. तर एका मित्राच्या समावेश आहे.
पर्यंटकांची असते गर्दी
घोडाझरी तलाव हा घोडाझरी धरणाचा एक भाग आहे. १९२३ मध्ये गोराझरी नदीवर सिंचन प्रकल्पांचा भाग म्हणून हा तलाव बांधण्यात आला होता. हे माती धरण आहे. घोडाझरी वन्यजीव अभयारण्यासाठी देखील ओळखले जाते. यामुळे घोडाझरी तलाव हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यामुळे साठगाव कोलारीमधील युवकही पर्यटनासाठी आले असण्याची शक्यता आहे.
घोडाझरी तलाव हे पक्षांसाठी महत्वाचे ठिकाणी आहे. या ठिकाणी स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी येतात. पक्षांना अखंड पाण्याचे स्रोत आणि भरपूर अन्न या तलावात मिळते. त्यामुळे पक्षी प्रेमी तलाव परिसरात येत असतात. तलावात अनेक सरपटणारे प्राणीसुद्धा आहेत.