Sunday, July 6, 2025
Homeकोल्हापूरशहीद सुनील गुजर यांना अखेरचा सलाम; चिमुकल्या रियांशचा पित्याच्या चेहऱ्याला स्पर्श, सर्वजण...

शहीद सुनील गुजर यांना अखेरचा सलाम; चिमुकल्या रियांशचा पित्याच्या चेहऱ्याला स्पर्श, सर्वजण गहिवरले

देशाच्या सीमेचे रक्षण करताना शहीद झालेले जवान सुनील गुजर यांचे पार्थिव गावात दाखल होताच, एकच आक्रोश झाला. त्यांच्या आई-वडिलांनी, पत्नीने आणि नातेवाईकांनी टाहो फोडताच उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला.

 

अमर रहे, अमर रहे, सुनिल गुजर अमर रहे’ या घोषणांनी आसमंत दुमदुमला. कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होताच शिवाय पितृछत्र हरपलेल्या पाच महिन्यांच्या रियांशकडे पाहताना उपस्थितांना गहिवरून आले. (Sunil Gujar Funeral)

 

जवान सुनील गुजर यांच्यावर आज (दि. १७) त्यांच्या मूळ गावी, शित्तूर तर्फ मलकापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला होता. शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी स्वप्नाली, पाच महिन्यांचा मुलगा रियांश, वडील विठ्ठल, आई लक्ष्मी आणि भाऊ अक्षय आणि परिवार आहे.

 

नियतीने क्रूर घाला घातला आणि अवघ्या पाच महिन्यांच्या रियांशच्या डोक्यावरचे पितृछत्र कायमचे हरपले. वडिलांचं प्रेम काय असते, वडील शहीद झाले, हे समजण्याचे वयही रियांशचे नाही. पण, नियतीने त्याच्यावर अकाली आघात केला. रियांशला उचलून जेव्हा पार्थिवाजवळ नेले, तेव्हा त्याने वडिलांच्या चेहऱ्याला स्पर्श केला. त्या निरागस स्पर्शाने सर्वांच्या काळजाला पीळ पडला. ज्या वडिलांनी त्याला अजून नीट पाहिलेही नव्हते, ते आज शांतपणे त्याच्यासमोर निपचित पडले होते. एकीकडे आई स्वप्नालीचा आक्रोश, तर दुसरीकडे वडिलांच्या पार्थिवाकडे निरखून पाहणारा रियांश. हे दृश्य अत्यंत वेदनादायी होते.

 

शहीद सुनील गुजर यांच्या अंत्यसंस्कारावेळी रियांशला पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. रियांशने प्रत्यक्ष बाप पहिल्यांदाच पाहिला, तोही निपचित पडलेला. यापूर्वी मोबाईलवर वडिलांचा आवाज ऐकला असेल, चेहराही व्हिडिओ कॉल वरून पाहिला असेल. अवघ्या पाच महिन्यांच्या रियांशला काय माहीत, त्याचे वडील कधीच परत येणार नाहीत? जावळाला येणाऱ्या बापाला मुलगा, तर मुलाला आपला बाप डोळेभरून पाहायचा होता, पण नियतीच्या मनात वेगळंच होते. अरुणाचल प्रदेशात चीन सीमेवर देशाचे रक्षण करताना सुनील गुजर शहीद झाले आणि दोघांच्याही स्वप्नांचा चक्काचूर झाला.

 

सुनील गुजर हे ११० इंजिनियर रेजिमेंट बॉम्बे इंजिनियर ग्रुपमध्ये डोजर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. १३ मार्चरोजी अरुणाचल प्रदेशात रस्ता दुरुस्तीचे काम करत असताना, त्यांचा डोजर ५०० फूट खोल दरीत कोसळला आणि ते शहीद झाले. रियांशचे पितृछत्र हरपले, शहीद सुनील गुजर यांच्या बलिदानाला सलाम करत, रियांशला आणि त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो, हीच प्रार्थना.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -