Friday, July 25, 2025
Homeमहाराष्ट्रअंगणवाडी सेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; लाडकी बहीण योजनेच्या अर्जाभरल्यापोटी एक कोटी ३७...

अंगणवाडी सेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता; लाडकी बहीण योजनेच्या अर्जाभरल्यापोटी एक कोटी ३७ लाख प्राप्त

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांच्या प्रोत्साहन भत्त्यापोटी जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाला १ कोटी ३७ लाख ७७ हजार ७०० रुपये प्राप्त झाले आहेत.

 

मात्र, पैसे आले तरी अंगणवाडी सेविकांना ते पुढील आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना आणखी वाट पहावी लागणार आहे.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस, महा ई सेवा केंद्र चालकांनी लाडक्या बहिणींचे अर्ज भरले होते. सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून ५० रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार प्रशासनाकडून राज्याकडे निधीची मागणी करण्यात आली होती. मात्र, लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरवात होऊन ९ महिने होत आले तरी त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नव्हता. ग्रामीण भागात अर्ज भरताना अंगणवाडी सेविका व मदतनिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते.

 

अनेकदा आॅफलाइन माहिती घेऊन रात्री उशिरापर्यंत किंवा पहाटे आॅनलाइन माहिती भरण्याचे काम त्यांना करावे लागले होते. लाडक्या बहिणींना लाभ वाटप सुरू होऊनही कामाचे पैसे मिळण्यास इतका विलंब झाल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात होती. आता महिला व बालविकास विभागाकडे निधी प्राप्त झाला आहे. त्या बिलाला मंजुरीही मिळाली आहे. येत्या दोन दिवसांत बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निधी वर्ग करण्यात येणार आहे. मात्र, शनिवार-रविवारच्या सुटीमुळे त्यानंतरच अंगणवाडी सेविका-मदतनिसांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे.

 

महा ई सेवा केंद्रचालक वंचित

 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह महा ई सेवा केंद्रचालकांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाडक्या बहिणींचे अर्ज भरले आहेत. सध्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्यासाठी निधी प्राप्त झाला आहे. मात्र, केंद्र चालकांसह नागरी भागात यासाठी मदत केलेल्या अन्य कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्यासाठी निधी प्राप्त झाला नाही. त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महिला व बालविकास विभागाने सांगितले.

 

प्रोत्साहन भत्त्याचा निधी प्राप्त झाला आहे. बिलाला मंजुरी मिळाली असून दोन दिवसांत सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निधी वर्ग केला जाणार आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविका व मदतनिसांना प्रोत्साहन भत्ता मिळेल. तसेच महा ई सेवा केंद्रांच्या प्रोत्साहन भत्त्यासाठी राज्याकडे प्रयत्न सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -