आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) ‘रन’संग्रमाला शनिवारी 22 मार्चपासून सुरुवात झाली. या मोसमातील सलामीच्या सामन्यात गतविजेता कोलकाता विरुद्ध बंगळुरु आमनेसामने होते. या सामन्यात आरसीबीने गतविजेता कोलकातावर विजय मिळवला. केकेआरने आरसीबीला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने हे आव्हान 16.2 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. आरसीबीसाठी विराट कोहली याने विजयात प्रमुख भूमिका बजावली. विराटने नाबाद 59 धावा केल्या. तर फिलीप सॉल्ट याने 56 धावांचं योगदान दिलं. तर कर्णधार रजत पाटीदार याने 16 बॉलमध्ये 34 धावांची झंझावाती खेळी केली.
त्याआधी बंगळुरुने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. केेकेआरसाठी सुनील नारायण आणि कर्णधार अजिंक्य रहाणे या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर केकेआरचा डाव गडगडला. त्यामुळे केकेआरला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. केकेआरला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 174 धावाच करता आल्या. केकेआरसाठी कर्णधार अजिंक्य रहाणे याने सर्वाधिक 56 धावांची खेळी केली. तर सुनील नारायण याने 44 धावा जोडल्या. तर अंगकृष रघुवंशी याने 30 धावांची निर्णायक खेळी केली. मात्र इतर फलंदाज निष्प्रभ ठरले. परिणामी केकेआरला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे आरसीबीने 175 धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं.